मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयनं मुंबईच्या कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. २०२० साली सुशांत सिंह राजपूतचा त्याच्या राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाला होता. मुंबईतील फ्लॅटमध्ये सुशांत सिंहने आत्महत्या केल्याचं समोर आले. मात्र त्याच्या मृत्यूवर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. कुटुंबानेही त्याच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडे द्यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयला सोपवला होता.
सूत्रांनुसार, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी कुठलेही ठोस पुरावे मिळाले नाहीत त्यामुळे हे प्रकरण बंद करण्यात यावं असं कोर्टाला रिपोर्ट दिला आहे. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा त्याच्या मृत्यूवर कुटुंबाने प्रश्न उपस्थित केले होते. सुशांत जीव देऊ शकत नाही यामागे नक्कीच काहीतरी षडयंत्र आहे असा दावा कुटुंबाने केला होता. मात्र यावर सीबीआयने क्लोजर रिपोर्ट कोर्टात सादर केला आहे. त्यामुळे हा क्लोजर रिपोर्ट स्वीकारून प्रकरण बंद करावे की तपास यंत्रणाचे पुढे चौकशीचे आदेश द्यावेत हे कोर्ट ठरवणार आहे.
१४ जून २०२० मध्ये सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ४ वर्ष ४ महिन्यांनी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. विशेष म्हणजे या क्लोजर रिपोर्टमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चीट दिल्याचं माध्यमांनी वृत्त दिले आहे. सुशांतच्या कुटुंबाने रिया चक्रवर्ती हिच्यावर आरोप लावले होते मात्र त्यात पुरावे आढळले नाहीत.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत कुटुंबाकडे आता प्रोटेस्ट पिटिशन मुंबई कोर्टात दाखल करण्याचा पर्याय आहे. सीबीआयने एम्स एक्सपर्टकडून सुशांत राजपूत आत्महत्येची चौकशी केली होती. यात एम्सच्या फॉरेन्सिक टीमनेही काही गडबड नसल्याचं म्हटलं होते. रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाने सुशांत सिंह राजपूतच्या पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबाने केला होता. परंतु एका मुलाखतीत रियाने ते आरोप फेटाळले होते.
CBI च्या रिपोर्टमध्ये काय?
- सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती, कुणाचाही दबाव नव्हता
- रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चीट
- मृत्यूमागे कुठलेही षडयंत्र आढळून आले नाही
- एम्सच्या फॉरेन्सिक टीमनेही हत्येची शक्यता फेटाळली
- सोशल मिडिया चॅट्स अमेरिकेला पाठवून पडताळले, त्यातही छेडछाड केल्याचा पुरावा नाही