Join us

Yuvraj Singh's Retirement: लहान असताना युवराज सिंगने केले होते या चित्रपटात काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 18:55 IST

युवराज हा क्रिकेटर बनण्याच्याआधी अभिनेता होता असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्ही यावर विश्वास ठेवाल का?

ठळक मुद्देयुवराज सिंग लहान असताना त्याने एका पंजाबी चित्रपटात काम केले होते. मेहेंदी शगना दी या 1992 ला प्रदर्शित झालेल्या चित्रपटात युवराज झळकला होता. या चित्रपटात एका शाळेत जाणाऱ्या मुलाच्या भूमिकेत तो दिसला होता.

भारताच्या 2011च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा शिल्पकार युवराज सिंगने निवृत्ती घेण्याचे नुकतेच जाहीर केले. मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्याने ही घोषणा केली. ही घोषणा करताना युवी भावुक झाला होता... 17 वर्षांच्या कारकिर्दीत मी अनेक चढउतार पाहिले. क्रिकेटने मला सर्व काही दिलं आणि म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे, असे तो म्हणाला. युवराज सिंगचे आयुष्य हे एखाद्या रोलर कोस्टर राईटसारखे आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरले नाही. कॅन्सरसारख्या आजारावर मात करत तो मैदानावर परतला होता. 

युवराज हा क्रिकेटर बनण्याच्याआधी अभिनेता होता असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्ही यावर विश्वास ठेवाल का? हो... पण हे खरे आहे. युवराज सिंग लहान असताना त्याने एका पंजाबी चित्रपटात काम केले होते. मेहेंदी शगना दी या 1992 ला प्रदर्शित झालेल्या चित्रपटात युवराज झळकला होता. या चित्रपटात एका शाळेत जाणाऱ्या मुलाच्या भूमिकेत तो दिसला होता. या चित्रपटाच्या वेळी युवराजचे वय केवळ 11 वर्षं इतकेच होते. 

युवराजचे अभिनयक्षेत्रावर लहानपणापासूनच प्रेम असल्याने बहुधा त्याने एका अभिनेत्रीशीच लग्न केले आहे. त्याची पत्नी ही अभिनेत्री हॅजल कीच असून तिने सलमान खान, करिना कपूर यांच्या बॉडीगार्ड या चित्रपटात काम केले होते. 

मागील दोन वर्ष मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या युवीला हा निर्णय जाहीर करताना भावनांवर नियंत्रण ठेवणे जड जात होते. पत्रकारांशी संवाद साधताना त्याच्या आवाजातून हे जाणवत होते. पण, त्याने मनावर दगड ठेवून हा निर्णय जाहीर केला. युवराजचा निवृत्तीचा निर्णय तडकाफडकी नव्हता. निवृत्ती घेण्याचा निर्णय हा वर्षभरापूर्वीच घेण्याचा विचार केला होता, असे युवीने सांगितले.

2007 चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, 2011चा वन डे वर्ल्ड कप आणि 19 वर्षांखालील वर्ल्ड कप असे विविध वयोगटातील सर्व वर्ल्ड कप युवराजने खेळले असून हे तीनही वर्ल्ड कप जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे. गेली दोन वर्ष युवराज भारताकडून एकही वन डे किंवा ट्वेंटी -20 सामना खेळलेला नाही. भविष्यातही त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळेल याची शक्यताही कमी आहे. त्यामुळे त्याने निवृत्ती स्वीकारली.

टॅग्स :युवराज सिंग