Join us

ऐन तारुण्यात पडद्यावर रंगवले वार्धक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:26 IST

आमिर खान सध्या आमिर ५0 वर्षांचा आहे. त्याच्या आगामी 'दंगल' चित्रपटात तो ५५ वर्षीय कुस्ती पहिलवानाची भूमिका साकारत आहे. ...

आमिर खान सध्या आमिर ५0 वर्षांचा आहे. त्याच्या आगामी 'दंगल' चित्रपटात तो ५५ वर्षीय कुस्ती पहिलवानाची भूमिका साकारत आहे. वय जास्त वाटावे यासाठी ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली आहार आणि व्यायाम करताना आमिरने त्याचे वजन तब्बल ९0 किलो केले आहे. या वाढलेल्या वजनामुळे तो खरच जास्त वयाचा वाटत आहे. बॉलिवूडमध्ये आहे त्या वयापेक्षा कमी दिसण्यासाठी सेलिब्रिटीज काहीही करायला तयार असतात. त्यातल्या त्यात अभिनेत्रींच्या बाबतीत तर विचारायलाच नको खरे वय लपवणे, वर्ष न सांगता फक्त जन्मतारीखच सांगणे हे तर नित्याचेच आहे.परंतु भूमिकेची गरज असल्यास मात्र ही स्टार मंडळी अजिबात मागे पुढे पाहात नाहीत. ताकदीची भूमिका असेल तर स्वत:च्या वयापेक्षा जास्त वयाची भूमिकाही ते सर्रास स्वीकारतात. अभिनेत्रीही यात तसुभरही मागे नाहीत. नितेश तिवारीच्या आगामी 'दंगल'चित्रपटात आमिर खान त्याच्या वयापेक्षा जास्त वयाची भूमिका साकारत आहे. चला तर मग भेटूया तरुणपणीच 'म्हातार्‍या' झालेल्या काही सेलिब्रिटींना..तब्बू  अशा प्रकारच्या भूमिका साकारताना तब्बू कधीच डगमगली नाही. अवघ्या तिशीत असताना आणि करिअर ऐन जोमात असताना तब्बूने 'चांदणी बार' मध्ये कुमारवयीन मुलाच्या आईची भूमिका केली होती. आणि आता 'हैदर' मध्ये वयाच्या ४३व्या वर्षी तिने शाहिद कपूरच्या आईचे पात्र साकारले. तिच्या या भूमिकेचेही खूप कौतुक झाले.शाहरुख खान 'वीर-झरा'च्या वेळी वयाची जेमतेम चाळीशी गाठणार्‍या शाहरूखने या चित्रपटासाठी ६0-६५ वर्षे वयाच्या वृद्धाची भूमिका साकारली होती. वार्धक्याने झुकलेला, थकलेला, बुजलेला, प्रौढत्वाकडे वाटचाल केलेला माणूस शाहरुखने अगदी हुबेहुब निभावला होता. त्याच्या चेहर्‍यावरील वार्धक्याचे भाव आजही प्रेक्षकांच्या समरणात आहेत.प्रियांका चोप्रा विशाल भारद्वाजच्या 'सात खून माफ'च्या वेळी प्रियांका २९ वर्षाची होती. या चित्रपटातच वेगवेगळ्या भूमिका करताना पिग्गी चॉप्सने वृद्ध आजीबाईंची भूमिकाही न बिचकता केली होती. तसेच 'बर्फी' चित्रपटातही शेवटच्या काही मिनिटांसाठी तिने मध्यमवयीन भूमिका साकारली होती.हृतिक रोशन 'क्रीश' चित्रपटात हृतिकने तरूण भूमिकेसोबतच त्याच्या खर्‍या वयाच्या अडीचपट वयाचे पात्र साकारले होते. या चित्रपटात नायकाचे पात्र साकारतानाच नायकाच्या आजोबाचे पात्रही त्याने केले होते. पांढरे केस, सुरकुत्यांनी भरलेला चेहरा असा वेगळाच हृतिक या चित्रपटात दिसला.ऐश्‍वर्या राय-बच्चनएकीकडे या जगतसुंदरीच्या सौंदर्याचे गुणगान गाताना दुनिया थकत नाही, आणि दुसरीकडे भूमिकेची गरज असल्यास केसांना रूपेरी रंग लावताना ऐश्‍वर्या मागे-पुढे पाहात नाही. 'उमराव जान', 'गुरू' या चित्रपटात ऐशने जास्त वयाच्या भूमिका रंगवल्या, तसेच 'अँक्शन रिप्ले'मध्ये तर ती आदित्य रॉय कपूरची 'हॉट' मम्मा बनली.अभिषेक बच्चन३१ वर्षांचा असताना अभिषेकने 'गुरू' चित्रपट स्वीकारला. यात धीरूभाई अंबानींशी मिळती-जुळती भूमिका करताना अभिषेकने मध्यमवयीन भूमिकाही चांगल्याच ताकदीने पेलली. होतकरू तरुण ते यशस्वी व्यावसायिक असा ज्युनिअर बी ने केलेला प्रवास या चित्रपटात पहायला मिळाला.