Join us
Daily Top 2Weekly Top 5

यामी गौतम विरुद्ध कृती सनॉन? सोशल मीडियावरील 'कोल्ड वॉर'च्या चर्चेवर यामीने मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 15:02 IST

'थर्ड क्लास' पीआर स्टंटचा आधार..., काय म्हणाली यामी गौतम?

इन्स्टाग्रामवरील एका 'लाईक'मुळे सध्या बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम चर्चेत आली होती. सोशल मीडियावर क्रिती सनॉनविरुद्धची एक पोस्ट यामीने लाईक केली होती. याचा नेटकऱ्यांनी अक्षरश: किस पाडला होता. या दोन्ही अभिनेत्रींमध्ये 'कोल्ड वॉर' सुरू असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. यामीला कृतीच्या यशाचा हेवा वाटत असल्याचा दावा केला जात होता. मात्र, आता यामी गौतमने या प्रकरणावर मौन सोडले असून, आपण कधीही अशा प्रकारच्या 'थर्ड क्लास' पीआर स्टंटचा आधार घेतला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नेमकं प्रकरण काय?नुकतेच कृती सनॉनला 'तेरे इश्क में' या चित्रपटासाठी झी सिने अवॉर्ड मिळाला. या चित्रपटातील तिच्या कामाचे कौतुक झाले असले तरी, यामी गौतमच्या 'हक' चित्रपटातील शाझिया बानोच्या भूमिकेचीही मोठी चर्चा झाली होती. मात्र, यामीला कोणताही पुरस्कार मिळाला नाही. दरम्यान, कृती सनॉनचा एक व्हिडिओ (रील) समोर आला, ज्यामध्ये ती पुरस्काराचा आनंद साजरा करताना दिसत होती. धक्कादायक म्हणजे, या व्हिडिओमध्ये यामी गौतमचा एक जुना डायलॉग बॅकग्राउंडला जोडण्यात आला होता, ज्याद्वारे कृतीच्या पुरस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

व्हिडिओमध्ये यामी म्हणत होती की, "तुम्ही तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करता, तरीही गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. त्यामुळे मी आता कोणत्याही व्हॅलिडेशनची अपेक्षा करणे सोडून दिले आहे. पुरस्कार मिळाला तरच मी चांगली अभिनेत्री ठरेन, असे काही नाही." या व्हिडिओच्या शेवटी 'हे योग्य आहे का?' असा प्रश्न विचारण्यात आला होता. यामीने चुकून हा व्हिडिओ 'लाईक' केल्यामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले आणि तिच्यावर कृतीबद्दल मत्सर असल्याचा आरोप करण्यात आला.

यामी गौतमचे स्पष्टीकरणया वादानंतर यामी गौतमने आपल्या 'X' (ट्विटर) अकाऊंटवर एक सविस्तर पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिलं. यामी म्हणाली, "मला समजले आहे की मी अशा एका रीलला 'लाईक' केले आहे जे दुसऱ्या कलाकाराचा अपमान करणारे आहे. आम्हाला दररोज अनेक गोष्टींमध्ये टॅग केले जाते आणि हे रील देखील इतर टॅगप्रमाणेच समोर आले होते. त्यामुळे हे जाणीवपूर्वक केलेले नाही. जर काही झाले असेल, तर ते चुकून क्लिक झाले असावे."

यामीने पुढे ठामपणे सांगितले की, तिने आपल्या करिअरमध्ये कधीही स्वस्तातल्या लोकप्रियतेसाठी पीआर स्टंटचा वापर केलेला नाही. "मी नेहमी माझ्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. क्लिकबेटच्या जगात अशा गोष्टींना गॉसिप बनवणे सोपे असते, परंतु मला आशा आहे की मीडिया पोर्टल्स माझ्या प्रतिष्ठेचा विचार करतील. माझी स्वतःची कोणतीही पीआर टीम नाही आणि अवॉर्ड शोजबाबत माझी भूमिका मी आधीच सांगितली आहे," असे यामीने स्पष्ट केले.

टॅग्स :यामी गौतमक्रिती सनॉनबॉलिवूड