Join us

छोट्या पडद्यावर काम करायला आवडेल - यामी गौतम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 18:26 IST

* सनम रे या चित्रपटानंतर तू पुल्कितसोबत जुनुनियत या चित्रपटात पुन्हा एकदा काम करत आहेस, पुल्कितसोबत काम करण्याचा तुझा अनुभव ...

* सनम रे या चित्रपटानंतर तू पुल्कितसोबत जुनुनियत या चित्रपटात पुन्हा एकदा काम करत आहेस, पुल्कितसोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता?
- सनम रे हा चित्रपट जुनुनियतच्या आधी प्रदर्शित झाला असला तरी या चित्रपटांचे चित्रीकरण आम्ही एकत्रच केले होते. दोन दिवस आम्ही समनचे चित्रीकरण करायचो तर दोन दिवस जुनुनियतचे. यामुळे मी आणि पुल्कित दोघेही एका वेळी दोन व्यक्तिरेखा जगत होतो. पुल्कित हा खूप चांगला अभिनेता असल्याने त्याच्यासोबत काम करायला मजा येते. तसेच आमच्या दोघांची केमिस्ट्रीही आता खूप छान जमली आहे. 
* सनम रे आणि जुनुनियत हे दोन्ही चित्रपट प्रेमकथांवर आधारित आहेत. एकाच वेळी एकाच विषयावरच्या चित्रपटात काम करणे हे करियरसाठी धोकादायक आहे असे तुला वाटत नाही का?
- सनम रे आणि जुनुनियत या दोन्ही चित्रपटात प्रेमकथा असल्या तरी या दोन्ही चित्रपटांची कथा ही पूर्णपणे वेगळी आहे. कोणत्याही चित्रपटाची ताकद ही त्या चित्रपटाची कथा असते असा मला वाटते. कलाकारांनी कितीही चांगला अभिनय केला. पण चित्रपटाची कथा चांगली नसेल तर तो चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरत नाही. या दोन्ही चित्रपटांची कथा ही खूप चांगली आणि एकमेकांपेक्षा पूणपणे वेगळी आहे. त्यामुळे एकाच बाजाचे चित्रपट करण्यात मला काही हरकत वाटत नाही. 
* पुल्कित आणि तुझ्या जोडीचे सनम रे या चित्रपटाच्यावेळी कौतुक झाले होते. तू पुन्हा पुल्कितसोबत काम करत आहेस, तुझी आणि पुल्कितची जोडी बॉलिवुडमध्ये एक प्रसिद्ध जोडी म्हणून नावारूपाला येईल असे तुला वाटते का?
- चित्रपटातील प्रेमकथा आवडल्याशिवाय प्रेक्षकांना त्या चित्रपटातील जोडी आवडत नाही. आम्ही चांगल्या प्रेमकथा असलेल्या चित्रपटांमध्ये काम केले तर लोकांना आमची दोघांची जोडी आवडेल अशी मला खात्री आहे. लोक कलाकारांच्या नव्हे तर चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या प्रेमात पडत असतात. व्यक्तिरेखा सशक्त असेल तर प्रेक्षकांना जोडी आवडते. त्यामुळे जुनुनियत या चित्रपटातीलही आमची जोडी प्रेक्षकांना आवडेल असे मला वाटते.
* जुनुनियत या चित्रपटाची कथा ही आर्मी ऑफिसरच्या आयुष्यावर असल्याने तुम्ही या चित्रपटाच्या वेळी सैन्यातील अनेकांना भेटला होता हे खरे आहे का?
- जुनुनियत या चित्रपटात पुल्कित एका आर्मी ऑफिसरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण आम्ही काश्मीरमध्ये केले आहे. चित्रीकरणाच्या वेळी सैन्यातील अनेकांना आम्ही भेटलो होतो. तसेच चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्तानेही भारतीय सैनिकांना भेटायचे असे आम्ही ठरवले आहे. 
* बॉलिवुडमध्ये कोणीही गॉडफादर नसतानाही तू तुझे प्रस्थ बॉलिवुडमध्ये निर्माण केले आहेस. बॉलिवुडमध्ये प्रस्थ निर्माण करण्यासाठी गॉडफादरची आवश्यकता असते असे तुला वाटते का?
- गॉडफादर असल्यास तुम्हाला बॉलिवुडमध्ये ब्रेक मिळतो. पण पहिला चित्रपट केल्यानंतर इंडस्ट्रीत टिकून राहाणे हे खूप महत्त्वाचे असते. हे तुमच्या अभिनयावरच अवलंबून असते. त्यामुळे गॉडफादर असणे महत्त्वाचे असते असे मला वाटत नाही.
* तू काबिल या चित्रपटात हृतिक रोशनसोबत काम करत आहे. काबिलच्या चित्रीकरणाचा तुझा अनुभव कसा आहे?
- काबिल या चित्रपटाची टीम ही खूपच चांगली आहे. संजय गुप्ता या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत तर या चित्रपटाचे संगीत राजेश रोशन देत आहेत. इतक्या चांगल्या टीमसोबत काम करणे हे माझ्यासाठी एखादे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. हृतिकसोबत काम करताना तो इतका मोठा स्टार आहे असे थोडेही जाणवत नाही. तो त्याच्या कामाच्या बाबतीत प्रचंड परफेक्ट असून तो स्वभावानेही खूप चांगला आहे.
* तू तुझ्या करियरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली आहे. पुन्हा छोट्या पडद्यावर काम करण्याचा विचार आहे का?
- छोटा पडदा हा माझ्यासाठी नेहमीच स्पेशल आहे. कारण छोट्या पडद्यामुळेच मला लोकांपर्यंत पोहोचता आले. आज छोटा पडदा खूप सशक्त बनला आहे. अनेक मोठे कलाकाराही येथे काम करत आहेत. त्यामुळे भविष्यात मला संधी मिळाली तर मला छोट्या पडद्यावर काम करायला नक्की आवडेल.
* तू दाक्षिणात्य, पंजाबी चित्रपटातही काम केले आहेस, तुला मराठी चित्रपटांमध्ये काम करायला आवडेल का?
- मराठी चित्रपटांची प्रगती पाहाता बॉलिवुडमधील अनेक प्रथितयश कलाकार मराठीत काम करण्यास उत्सुक आहेत. चांगली कथा असल्यास मी मराठीत नक्कीच काम करेन.