Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता दिसणार बाजीप्रभूंच्या भूमिकेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 17:30 IST

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘पानिपत’, ‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’, ‘तान्हाजी’ यांसारख्या चित्रपटांनी तिकीटबारीवर अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यानंतर आता बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.

‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर  दणदणीत कमाई केली. तेव्हापासून बॉलिवूडकरांना आता ऐतिहासिक चित्रपटांचे वेध लागलेत. ऐतिहासिक चित्रपटाची ऑफर  आता कुठलाही अभिनेता नाकारत नाहीये. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘पानिपत’, ‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’, ‘तान्हाजी’ यांसारख्या चित्रपटांनी तिकीटबारीवर अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यानंतर आता बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. दिग्दर्शक अभिजीत देशपांडे याने ट्विट करुन या आगामी चित्रपटाची माहिती दिली. या चित्रपटात बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अर्थात संजूबाबा बाजीप्रभूंच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

या आगामी चित्रपटाचे नाव ‘पावन खिंड’ असे आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त बाजीप्रभू यांच्या भूमिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. नुकतेच एका नेटकऱ्याने ट्विटच्या माध्यमातून या चित्रपटात संजय दत्तला बाजीप्रभू यांच्या भूमिकेसाठी कास्ट करण्याची विनंती केली होती. त्याच्या विनंतीवर अभिजीतने ओके अशी प्रतिक्रिया दिली. यावरुन पावनखिंडमध्ये संजय दत्त मुख्य भूमिकेत झळकणार अशी चर्चा आहे.

‘गजापूर’च्या खिंडीलाच ‘घोडखिंड’ असेही म्हटलं जातं. याच खिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी यांनी सिद्धीच्या सैन्याला रोखून ठेवलं होतं. हजारोंच्या सैन्याला रोखून धरलेल्या बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने १०-१२ तास खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली. मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने ‘घोडखिंड’ पावन झाली म्हणूनच तिचे नाव ‘पावनखिंड’ झाले.

दरम्यान, ‘आणि.. डॉ. काशीनाथ घाणेकर’ या चित्रपटाचेच दिग्दर्शक आणि निर्माते ‘पावनखिंड’चे दिग्दर्शन आणि निर्मिती करणार आहे. ‘आणि..डॉ. काशीनाथ घाणेकर’ चित्रपटाची निर्मिती सुनील फडतरे यांनी केली होती. तर दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केलं होतं. अद्यापतरी या चित्रपटाविषयी फारशी माहिती समोर आली नसून यात कोणकोणत्या कलाकारांची वर्णी लागणार हे देखील स्पष्ट झालेलं नाही.

टॅग्स :संजय दत्तबॉलिवूड