बॉलिवूड अभिनेते मनोज कुमार (Manoj Kumar) यांच्या निधनामुळे सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. ८७ वर्षीय अभिनेत्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. आज ५ एप्रिल रोजी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांचे पार्थिव घरी आणण्यात आले होते. तिथे श्रद्धांजली वाहण्यासाठी आली. सर्वांनी पुष्प अर्पण करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली. मात्र त्यांची पत्नी शशी गोस्वामी (Shashi Goswami) यांची अवस्था पाहून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले.
मनोज कुमार यांची पत्नी शशी आणि मुलगा कुणाल गोस्वामी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतो आहे. त्यांची अवस्था पाहून नेटकरीही भावुक झाले आहेत. मनोज कुमार यांची पत्नी ढसाढसा रडताना दिसत आहेत. त्यांना मुलगा सांभाळताना दिसत आहे. थरथरत्या हातांनी शशी यांनी पतीला पुष्पहार घातला आणि त्याच्यावर शेवटचं दर्शन घेतलं. पतीला अखेरचा निरोप देतानाची वेदना त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. त्या इतक्या दुःखात आहेत की त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही. शशी गोस्वामींचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही भावुक झाले आहेत.
मनोज कुमार आणि शशी गोस्वामी यांची प्रेमकहाणी रोमँटिक चित्रपटापेक्षा कमी नव्हती. चित्रपटात येण्यापूर्वीच या अभिनेत्याने स्वतःसाठी जीवनसाथी शोधला होता. दोघेही त्यांच्या कॉलेजच्या दिवसात भेटले होते. मनोज कुमार पहिल्या नजरेतच शशी यांच्या प्रेमात पडले होते. दीड वर्ष दोघांनी आधी एकमेकांवर मनापासून प्रेम केले आणि नंतर डेट करायला सुरुवात केली. कुटुंब विरोधात होते, पण प्रेमापुढे झुकावे लागले. अखेर त्यांचे प्रेम यशस्वी झाले आणि त्यांनी लग्न केले. या दाम्पत्याला कुणाल गोस्वामी आणि विशाल गोस्वामी अशी दोन मुले आहेत.