Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी कधीच पैसे घेतले नव्हते, नातवाला हिरो बनवण्यासाठी त्यांनी...", ९ कोटी प्रकरणावर स्पष्टच बोललेला राजपाल यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 16:50 IST

राजपाल यादव ९ कोटींच्या चेक बाऊन्स प्रकरणी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अता पता लापता' या सिनेमासाठी राजपालने पैसे घेतले होते. मात्र सिनेमा फ्लॉप झाल्याने त्याला नुकसान झालं. फसवणूक केल्याच्या आरोपांवर राजपाल यादवने एका मुलाखतीत काही वर्षांपूर्वी भाष्य केलं होतं. 

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव ९ कोटींच्या चेक बाऊन्स प्रकरणी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. काही दिवसांपूर्वीच "माझ्याकडे खरंच पैसे नाहीत", असं म्हणत राजपाल यादवने तिहार तुरुंगात सरेंडर केलं होतं. त्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटी त्याच्या मदतीला धावले. एका सिनेमासाठी राजपालने हे पैसे घेतल्याचं म्हटलं जात आहे. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अता पता लापता' या सिनेमासाठी राजपालने पैसे घेतले होते. मात्र सिनेमा फ्लॉप झाल्याने त्याला नुकसान झालं. फसवणूक केल्याच्या आरोपांवर राजपाल यादवने एका मुलाखतीत काही वर्षांपूर्वी भाष्य केलं होतं. 

लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत राजपाल यादव म्हणाला की, "मी हे सांगू इच्छितो की कोर्ट नसतं तर त्या लोकांनी मला फाशीवरच चढवलं असतं. मी खरंच सांगतो मला कोर्टाने वाचवलं आहे. कारण कोर्टात कोणीही अॅक्टिंग करू शकत नाही. राजपाल यादव एक सिनेमा जगणारा व्यक्ती आहे. माझ्यावर तीन आरोप लावले गेले आहेत. एक म्हणजे मी ५ कोटींची फसवणूक केली. दुसरं म्हणजे मी लोन घेतलं. आणि तिसरं म्हणजे मी ते पैसे गुंतवले. दिल्ली उच्च न्यायालयात याबाबत अजूनही खटला सुरू आहे. पण यामागचं सत्य फार वेगळं आहे. मी कोर्टाच्या प्रत्येक आदेशाचं पालन केलं आहे". 

अता पता लापता या सिनेमासाठी व्यावसायिक माधव गोपाळ अग्रवाल यांच्याकडून तू सिनेमासाठी ५ कोटी घेतलेस का? त्यावर राजपाल म्हणाला, "मी त्यांच्याकडून कधीच पैसे घेतले नाहीत. त्यांनी फायनान्सर म्हणून सिनेमात ते पैसे इन्वेस्ट केले होते. त्यांना त्यांच्या नातवाला हिरो बनवायचं होतं. मी त्या सिनेमाचा दिग्दर्शक कधीच नव्हतो. मी दिग्दर्शक कधीच नव्हतो आणि यापुढे कधी नसेन. मी केवळ एक अभिनेता आहे. कधी कधी १०० सामने खेळायचे असतात. क्रिकेटर ९५ सामने क्रिकेटचे आणि ५ फुटबॉलचे खेळतो. हा एक क्रिएटिव्ह एक्सपिरियंस होता. ७० मीमी पडद्यावर ब्रॉडवेला कसं क्रिएट कराल याचा प्रयोग होता. त्या सिनेमात २५०० लोकांनी काम केलं होतं. जर मी तो सिनेमा केला नसता तर मला वाटतं ही दुनिया कधीच कळाली नसती". 

राजपाल यादव गेल्या काही दिवसांपासून तिहार जेलमध्ये आहे. या प्रकरणात आज झालेल्या सुनावणीत कोर्टाने राजपाल यादवच्या जामीनावर पुढील सुनावणी सोमवारी होणार असल्याचं म्हटलं आहे. आणखी काही दिवस राजपाल यादवला कोर्टाची हवा खावी लागणार आहे. 

टॅग्स :राजपाल यादवसेलिब्रिटी