Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: इलेक्ट्रिशिअन सांगून अज्ञात व्यक्तीने केला माधुरी दीक्षितच्या घरात शिरकाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 16:41 IST

Madhuri dixit:अलिकडेच माधुरी 'द कपिल शर्मा शो'मध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने तिच्या घरी एका अज्ञात व्यक्तीने शिरकाव केल्याचं सांगितलं.

आपल्या निखळ हास्याने लाखो तरुणांना आजही घायाळ करणारी धकधक गर्ल म्हणजे माधुरी दीक्षित (madhuri dixit) . 'साजन', 'हम आपके हैं कौन', 'दिल', 'दिल तो पागल है', 'देवदास' अशा कितीतरी चित्रपटातून माधुरी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यामुळे आज प्रत्येक वयोगटात तिचा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.  लवकरच माधुरीची 'द फेम गेम' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या माधुरी या सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यामध्येच माधुरीने द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात हजेरी लावली होती.यावेळी तिने तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक किस्सा सांगितला.

अलिकडेच माधुरी 'द कपिल शर्मा शो'मध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने तिच्या घरी एका अज्ञात व्यक्तीने शिरकाव केल्याचं सांगितलं. सोबतच हा अज्ञात व्यक्ती नेमका कोणत्या उद्देशाने तिच्या घरात आला होता हेदेखील तिने सांगितलं.

"एकदा माझ्या घरातील स्वीचबोर्ड खराब झाला होता. त्यामुळे मी काही इलेक्ट्रीशिअन्सला बोलावलं होतं. यावेळी चार जण दुरुस्तीचं काम करायला आले होते. त्यांचं काम झाल्यावर ते जायला निघाले. या चौघांपैकी तीन जण निघून गेले. पण एक तसाच जागेवर उभा राहिला. या माणसाला पाहून मी तुम्ही त्या तिघांसोबत जात नाहीये का असा प्रश्न विचारला. त्यावर मी त्यांच्यासोबत आलोच नव्हतो. मी तर फक्त तुम्हाला भेटायला आलो होतो, असं उत्तर या माणसाने दिलं", असा अनुभव माधुरीने शेअर केला. 

दरम्यान, माधुरीने हा किस्सा सांगितल्यावर उपस्थित सगळेच हसू लागले. परंतु, अनेक सेलिब्रिटींना दैनंदिन जीवनात असे अनेक अनुभव येत असतात. माधुरी लवकरच द फेम गेम या सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करत आहे. या सीरिजमध्ये तिच्यासोबत संजय कपूरही स्क्रीन शेअर करणार आहे. विशेष म्हणजे ही जोडी तब्बल २६ वर्षांनंतर एकत्र झळकणार आहे. 

टॅग्स :माधुरी दिक्षितबॉलिवूडसिनेमासेलिब्रिटीकपिल शर्मा