सलमान खान आणि करण जोहरच्या बॅटल ऑफ सारागडी या चित्रपटाचे काय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2017 14:46 IST
करण जोहरने दिग्दर्शित केलेल्या कुछ कुछ होता है या चित्रपटात सलमान खान एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. कुछ कुछ ...
सलमान खान आणि करण जोहरच्या बॅटल ऑफ सारागडी या चित्रपटाचे काय होणार?
करण जोहरने दिग्दर्शित केलेल्या कुछ कुछ होता है या चित्रपटात सलमान खान एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. कुछ कुछ होता है हा करणच्या कारकिर्दीतील सुरुवातीचा चित्रपट आहे. तेव्हापासूनच करण आणि सलमान यांची खूप चांगली मैत्री आहे. करण आणि सलमानला कित्येक दिवसांपासून एकमेकांसोबत काम करायचे आहे. पण दोघेही आपापल्या कामात व्यग्र असल्याने त्यांना ते शक्य होत नाहीये. पण काही महिन्यांपूर्वी करण आणि सलमान यांनी काही चित्रपटांची एकत्र निर्मिती करण्याचे ठरवले होते. त्या चित्रपटांबाबत त्यांच्या दोघांमध्ये चर्चादेखील झाली होती. ते दोघे मिळून ड्राइव्ह आणि बॅटल ऑफ सारागडी अशा दोन चित्रपटांची निर्मिती करणार होते. पण ड्राइव्ह या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू व्हायच्या आधी सलमान खानने या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ड्राइव्ह या चित्रपटात सुशांत सिंग रजपूत आणि जॅकलिन फर्नांडिस प्रमुख भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात सुशांतला घेण्यात येऊ नये असे सलमानचे म्हणणे असल्याची चर्चा आहे. त्याने याबाबत करणला सांगितलेदेखील होते. पण तो त्याच्या मतावर ठाम राहिल्याने सलमानने या चित्रपटाची निर्मिती न करण्याचे ठरवले असे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी सलमानला याबाबत विचारण्यातदेखील आले होते. त्यावर कोण सुशांत, मी त्याला ओळखत नाही असे सलमानने उत्तर दिले होते. करण आणि सलमान यांच्यामध्ये दोन चित्रपटांच्या निर्मितीबाबत ठरले होते. पण आता ड्राइव्हमधून सलमान बाहेर पडल्यामुळे बॅटल ऑफ सारागडी या त्यांच्या दुसऱ्या चित्रपटाचे भवितव्य अंधारात असल्याची चर्चा आहे.