'१२th फेल', 'मिर्झापूर' अशा कलाकृतींमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे विक्रांत मेस्सी. विक्रांत त्याच्या आयुष्यातील बिनधास्त बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. विक्रांत मेस्सी आणि त्याची पत्नी शीतल ठाकूरने हे दोघं गेल्या वर्षी आई-बाबा झाले. त्यांच्या मुलाचं नाव आहे वरदान. विक्रांतने अलीकडेच एका मुलाखतीत वरदान कोणत्या धर्माचं पालन करतो, याचा उल्लेख केला. विक्रांतने दिलेल्या उत्तराने सर्वांचं मन जिंकलं.
विक्रांतचा लेक या धर्माचं करतो पालन
रिया चक्रवर्तीसोबतच्या पॉडकास्टमध्ये विक्रांत मेस्सीने मुलाच्या धर्माबद्दल उल्लेख केला. विक्रांत आणि शीतल या पती-पत्नीने मुलावर वेगळ्या पद्धतीने संस्कार केले आहेत. या दोघांनी बर्थ सर्टिफिकेटवर धर्माचा जो कॉलम असतो तो मोकळा सोडला आहे. तिथे त्यांनी काहीच लिहिलं नाहीये. विक्रांतने याविषयी सांगितलं की, "धर्म ही गोष्ट माझ्यासाठी आयुष्य जगण्याचा एक मार्ग आहे. पण ही माझी ओळख नाही. मोठं झाल्यावर कोणावर विश्वास ठेवता, याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य असायला हवं. धर्माच्या आधारावर माझ्या मुलाला ओळखलं जाऊ नये, हीच माझी इच्छा आहे."
विक्रांत पुढे म्हणाला, "जर मला पुढे जाऊन हे कळालं की, माझा मुलगा धर्माच्या आधारावर कोणासोबत भेदभाव करतोय तर एक पालक म्हणून मी तेव्हा हरेल. मी माझ्या मुलाला माणुसकी, सहिष्णुता आणि दुसऱ्यांबद्दल प्रेम निर्माण करायला शिकवतोय. हीच जीवनाची खरी मूल्य आहेत", अशाप्रकारे विक्रांतने मुलाच्या धर्माबद्दल मोठा खुलासा केला. विक्रांतच्या कुटुंबात सर्वांचा धर्म वेगळा आहे. विक्रांतचे वडील ख्रिश्चन आहेत, आई पंजाबी तर त्याच्या मोठ्या भावाने मुस्लिम धर्माचं पालन केलंय. विक्रांतची पत्नी हिंदू आहे. "धर्म प्रत्येकाची वैयक्तिक आवड असते, धर्मामुळे त्या व्यक्तीची समाजात ओळख होता कामा नये", असा खुलासा विक्रांतने केलाय.