Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका चोपडाला बघताच ‘या’ दिग्दर्शकाने म्हटले, ‘बॉलिवूडला नवी रेखा मिळाली’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2017 21:34 IST

देसी गर्ल प्रियंका चोपडाने २००३ मध्ये सनी देओलच्या ‘द हीरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. भलेही या चित्रपटात ...

देसी गर्ल प्रियंका चोपडाने २००३ मध्ये सनी देओलच्या ‘द हीरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. भलेही या चित्रपटात ती सहायक भूमिकेत होती, परंतु तिच्या या भूमिकेमुळे बॉलिवूडकरांना हे कळून चुकले होते की, मायानगरीत एका होतकरू अभिनेत्रीने पाऊल ठेवले आहे. या चित्रपटानंतर प्रियंकाने ‘अंदाज’, ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘एतराज’ यासारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटांमधून तिच्यातील अभिनय कौशल्यही अधोरेखित झाले. पुढे प्रियंकाने कधीही मागे वळून बघितले नाही, बॉलिवूडबरोबरच तिने हॉलिवूडमध्येही स्वत:चा बोलबाला निर्माण केला; मात्र प्रियंकाच्या या यशाची भनक एका दिग्दर्शकाला अगोदरच लागली होती. जेव्हा प्रियंका बॉलिवूडमध्ये आली होती, तेव्हा त्यांनी म्हटले होते की, ‘ही तर इंडस्ट्रीची नवी रेखा आहे.’होय, आता तुम्ही विचार करीत असाल की, ते दिग्दर्शक कोण असावेत? तर ते दुसरे-तिसरे कोणीही नसून, सुनील दर्शन आहेत. सुनील दर्शन बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. ज्यांनी इंडस्ट्रीमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. सुनील यांच्या अनेक हिट चित्रपटांपैकीच ‘अंदाज’ हा देखील एक हिट चित्रपट आहे. ज्यामध्ये प्रियंका चोपडा आणि अक्षय कुमार ही जोडी पहिल्यांदा बघावयास मिळाली होती. चित्रपटात दोघांनीही मुख्य भूमिका साकारली होती. नुकतेच सुनील दर्शन यांनी एका मनोरंजन वेबसाइटला त्यांच्या आगामी ‘एक हसीना थी एक दीवाना’ या चित्रपटाविषयी मुलाखत दिली. ज्यामध्ये सुनील यांनी याविषयीचा खुलासा केला आहे. सुनील दर्शन यांनी म्हटले की, ‘मी माझ्या ‘अंदाज’ या चित्रपटासाठी अभिनेत्रीच्या शोधात होतो. तेव्हा प्रियंकाच्या मॅनेजरने मला म्हटले की, एकदा प्रियंकाची तुम्ही भेट घ्या. जेव्हा प्रियंका पहिल्यांदा माझ्या आॅफिसमध्ये आली अन् तिला मी बघितले तेव्हाच माझ्या डोक्यात एक विचार आला. तो म्हणजे ही इंडस्ट्रीमधील नवी रेखा आहे. प्रियंकाचे डोळे, तिचा आवाज आणि शरीर तिच्याविषयी अधिक बोलत होते. प्रियंकाला बघितल्यानंतर मी शंभर टक्के खात्री देत होतो की, बॉलिवूडला आता नवी रेखा मिळाली आहे. एक काळ असा होता की, बॉलिवूडमध्ये रेखाने आपल्या अभिनयाचे जलवे दाखविले होते. आजही रेखाचे चित्रपट आवडीने बघितले जातात. तिची झलक प्रियंकामध्ये दिसत असेल असे जर म्हटले तर वावगे ठरू नये. कारण प्रियंका तिच्या समकालीन अभिनेत्रींच्या तुलनेत आजही यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास तिने लीलया पार केला आहे. हॉलिवूडमध्ये तर प्रियंकाला एका पाठोपाठ एक असे प्रोजेक्ट मिळत आहेत.