थिएटरमध्ये हा सिनेमा पाहा WITHOUT INTERVAL BREAK
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2017 11:01 IST
आपल्या सिनेमाची प्रसिद्धी व्हावी, चर्चा व्हावी यासाठी निर्माते-दिग्दर्शक विविध फंडे वापरत असतात. सिनेमा रसिकांपर्यंत पोहचण्यासोबतच त्याचं मार्केटिंग होणंही तितकंच ...
थिएटरमध्ये हा सिनेमा पाहा WITHOUT INTERVAL BREAK
आपल्या सिनेमाची प्रसिद्धी व्हावी, चर्चा व्हावी यासाठी निर्माते-दिग्दर्शक विविध फंडे वापरत असतात. सिनेमा रसिकांपर्यंत पोहचण्यासोबतच त्याचं मार्केटिंग होणंही तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपल्या सिनेमात काही तरी वेगळं आणि काही तरी हटके असावं असा प्रयत्न बॉलीवुडच्या किंबहुना सर्वच निर्माता-दिग्दर्शकांचा असतो. असाच काहीसा प्रयत्न केला तो 'ट्रॅप्ड' या सिनेमाच्या निर्माता-दिग्दर्शकांनी. ट्रॅप्ड या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून या सिनेमाची कथा आणि पात्र याबाबत रसिकांमध्ये कुतुहल निर्माण झालं आहे. 'ट्रॅप्ड' हा सिनेमा पाहताना रसिकांना एक वेगळा अनुभव मिळणार आहे. सिनेमाचं रोमांच, त्यातील थरार आणि सिनेमातील एकही क्षण चुकला जाऊ नये यासाठी हा सिनेमा इंटरव्हलशिवाय दाखवला जाणार आहे. त्यामुळे रसिकांना कोणत्याही ब्रेकशिवाय सिनेमागृहात पाहता येणार आहे. विक्रमादित्य मोटवानी यांनी ट्रॅप्ड हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाचा कालावधी हा एकूण 105 मिनिटे इतका आहे.'ट्रॅप्ड' हा सिनेमा हा शीर्षकाप्रणाचे एका अडकलेल्या व्यक्तीची कथा आहे. या सिनेमात रसिकांना रोमांच, थ्रिलर या सा-याचा अनुभव घेता येणार आहे. सिनेमातील हा एक व्यक्ती एका अपार्टमेंटमध्ये अडकला आहे. त्याच्याकडे ना पिण्यासाठी पाणी आहे ना खाण्यासाठी अन्न. या अपार्टमेंटमध्ये वीजसुद्धा नाही. अशा भीतीदायक आणि तितक्याच आव्हानात्मक परिस्थितीतून या व्यक्तीला स्वतःची सुटका करायची आहे. या सगळ्या परिस्थितीतून तो बाहेर पडतो का?, कशारितीने हा व्यक्ती या ट्रॅप्डमधून आपली सुटका करतो, कुणी त्याला या ट्रॅप्डमध्ये अडकवलं आणि का या सगळ्यांची उत्तरं या 105 मिनिटांत मिळणार आहेत. सिनेमाचा कालावधी आणि त्याची कथा पाहिली तर त्याची उत्कंठा कायम राहण्यासाठी तो सलग पाहण्यातच खरी मजा आहे. थिएटरमधील इंटरव्हलमुळे कदाचित या 105 मिनिटाच्या काळात या व्यक्तीबरोबर घडणा-या घटना, रोमांच, थ्रिल याचा रसिकांना अनुभव घेता येणार नाही. त्यामुळेच हा सिनेमा इंटरव्हलशिवाय रसिकांना पाहता येणार आहे. इंटरव्हलविना रिलीज होणारा ट्रॅप्ड हा काही पहिला सिनेमा नाही. याआधी आमीर खान प्रॉडक्शन्सचा 'धोबीघाट' हा सिनेमासुद्धा इंटरव्हलशिवाय रिलीज करण्यात आला होता.