यशराज फिल्म्सने आज त्यांचा बहुचर्चित चित्रपट 'वॉर २' मधील पहिलं गाणं 'आवन जावन' रिलीज केलं आहे. हे एक रोमँटिक गाणं आहे, ज्यामध्ये हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी अत्यंत कूल अंदाजात झळकत आहेत. या गाण्याला विशेष बनवणारं कारण म्हणजे 'ब्रह्मास्त्र' मधील 'केसरिया' हे हिट गाणं बनवणारी टीम पुन्हा एकत्र आली आहे. दिग्दर्शक अयान मुखर्जीने यासाठी खास पुढाकार घेतला आहे. जाणून घ्या या गाण्याबद्दल
'वॉर २'मधलं पहिलं गाणं
'वॉर २'मधील 'आवन जावन' या गाण्याला संगीत दिलं आहे प्रीतमने. गाण्याचे शब्द लिहिले आहेत अमिताभ भट्टाचार्य यांनी आणि आवाज दिला आहे अरिजीत सिंगने. 'आवन जावन' हे आजच्या काळातलं नवीन रोमँटिक गाणं बनत आहे जे रिलीज होताच ट्रेडिंगवर आलं आहे. या गाण्याला अरिजित सिंगसोबत गायिका निकिता गांधीची साथ मिळाली आहे.सध्या 'आवन जावन' हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हृतिक आणि कियाराची केमिस्ट्री व त्यांचा सहज वावर प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. त्यामुळे 'वॉर २' जेव्हा मोठ्या पडद्यावर रिलीज होईल, तेव्हा हे गाणं बघायला आणखी मजा येईल.
'वॉर २'च्या रिलीजला काही दिवस बाकी
YRF ने काल जाहीर केलं होतं की, हे गाणं कियारा अडवाणीच्या वाढदिवसानिमित्त तिला आणि तिच्या चाहत्यांना खास भेट म्हणून देण्यात येणार आहे. आज हे गाणं प्रदर्शित झाल्यावर, या गाण्याला मिळणारा प्रतिसाद पाहता हे स्पष्ट होतंय की 'आवन जावन' आधीच सुपरहिट ठरलं आहे. 'वॉर २' सिनेमाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले आहे आणि निर्मिती आदित्य चोप्रा यांची आहे. हा सिनेमा १४ ऑगस्ट रोजी हिंदी, तेलुगु आणि तमिळ भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.