हृतिक रोशन, ज्युनिअर एनटीआर आणि कियारा अडवाणीच्या 'वॉर २' (War 2) सिनेमाची जोरदार चर्चा आहे. सिनेमातील अॅक्शन सीक्वेन्स, हृतिक- ज्यु. एनटीआर यांची फाईट, हृतिक आणि कियाराची रोमँटिक केमिस्ट्री यामुळे सिनेमाची उत्सुकता आहे. सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्येच कियाराच्या बिकिनी सीननही सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. मात्र आता तिचा बिकिनी सीन सिनेमातून हटवण्यात आल्याची चर्चा आहे. सेन्सॉर बोर्डाने या सीनवर कात्री चालवली आहे.
अयान मुखर्जी दिग्दर्शित 'वॉर २' सिनेमाला केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने म्हणजे सीबीएफसीने प्रमाणपत्र देताना सिनेमात काही बदल सांगितले आहेत. तसंच काही सीन्सवर मंडळाने कात्रीही फिरवली आहे. यात अॅक्शन दृश्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे छाटनी झालेली नाही. मात्र इतर दृश्य आणि संवाद बदलण्याचे किंवा हटवण्याचे निर्देश दिले आहेत.
बॉलिवूड हंगामा रिपोर्टनुसार, सीबीएफसीने एका सीनमध्ये अश्लील संवाद बदलण्यास सांगितलं आहे. तसंच एका कॅरेक्टरचे २ सेकंदाचे अश्लील हावभाव काढून टाकण्याची सूचना केली आहे. तसंच मेकर्सला सेंशुअल सीन्स ५० टक्के कापण्यास सांगितलं आहे. हे ९ सेकंदांचे सीन्स आहेत. हे दृश्य म्हणजे सिनेमातील आवन जावन गाण्यातील कियाराचे बिकिनी शॉट्स आहेत असं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे अॅक्शन शॉट्स जशास तसे ठेवले आहेत.
या बदलांनंतर 'वॉर २'ला U/A सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. सिनेमाची लांबी १७९.४९ मिनिटे आहे. याचाच अर्थ २ तास ५९ मिनिटांचा हा सिनेमा आहे. येत्या १४ ऑगस्ट रोजी 'वॉर २' रिलीज होणार आहे.