आपण आपलं हक्काचं घर बनवताना, कधीतरी खरंतर थोडं थांबलं पाहिजे आणि एकदा तरी त्या बांधकाम मजुरांच्या हातांकडे पाहिलं पाहिजे, ज्या हातांनी आपल्या स्वप्नातलं घर उभं केलं. कदाचित आपल्याला त्यांचं नाव माहीत नसेल, पण त्यांच्या कष्टांमध्ये त्यांनी घडवलेली मेहनतीची आणि संघर्षाची एक अविश्वनीय कहाणी दडलेली असते. त्यामुळेच १ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने बांधकाम मजुरांसाठी एक हृदयस्पर्शी गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. हे गीत ख्यातनाम गायक विशाल ददलानी यांच्या दमदार आवाजात साकारलेलं असून, संगीतकार चैतन्य पंडित यांनी ते संगीतबद्ध केलं आहे आणि गीतकार चैतन्य पंडित व चिराग मोदी यांनी शब्दबद्ध केलं आहे.
विशाल ददलानी म्हणाला की, आपली घरे उभारणाऱ्या बांधकाम मजुरांचे आपण फार क्वचित आभार मानतो , खरतरं मानतही नाही , तेही असे लोक जे कोणतीही अपेक्षा न ठेवता आपलं घर बनवत राहतात. जेव्हा सुगी ग्रुपने मला कामगार दिनानिमित्त बांधकाम मजुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या खास गाण्यासाठी आवाज द्यायला सांगितलं, तेव्हा मी मनापासून भारावून गेलो. या गाण्याला खरी उर्जा मिळते त्यांच्या रोजच्या कष्टांच्या ठेक्यातून, जसे हातोड्यांचे ठोके, ड्रिल मशीनचा गडगडाट, रॅमर आणि शीअर्सचे आवाज. या खऱ्या आवाजांनी गाणं जसं वास्तवाशी जोडलेलं आहे, तसंच ते प्रत्येक मजुराच्या श्रमाची गोष्टही सांगतं. या गाण्यासाठी माझा आवाज देणं केवळ एक संगीतात्मक निर्णय नव्हता, तर एक भावनिक अनुभव सुद्धा होता.