Virat Kohli And Anushka Sharma In Ayodhya: अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) हे दोघेही अध्यात्माकडे वळले आहेत. ते बहुतेक वेळ देवाच्या भक्तीत घालवत आहेत. कधी कृष्ण दास यांच्या कीर्तन भजनात दंग झालेले पाहायला मिळालेत. तर कधी प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात दिसून आलेत. आता नुकतंच अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे अयोध्येत पोहचले. या ठिकाणी त्यांनी हनुमान गढी मंदिराला भेट दिली आणि राम मंदिरात दर्शन घेतलं.
विराट आणि अनुष्काचा अयोध्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये अनुष्का आणि विराट हे हनुमान गढी मंदिरात प्रार्थना करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसते. तिने डोक्यावर ओढणी घेत बजरंगबलीचं दर्शन घेतलं. तर विराट कोहली हा पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसला. यावेळी दोघेही देवाच्या भक्तीत मग्न असल्याचं दिसून आले. मंदिर प्रशासनाकडून दोघांच्याही गळ्यामध्ये हार घालण्यात आले.
दोघांनीही २० मिनिटे हनुमान गढी येथे दर्शन आणि पूजा केली. यानंतर ते राम मंदिरात पोहोचले आणि रामलल्लाचं दर्शन घेतलं. अर्धा तास मंदिर परिसरात थांबल्यानंतर दोघेही लखनऊला रवाना झाले.यावेळी विराट आणि अनुष्काला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. इतकी प्रसिद्धी आणि यश मिळवूनही, देवावरील या दोघांच्या दृढ विश्वासाचं अनेकांनी कौतुक केले आहे.
काही दिवसांपूर्वीच १३ मेला विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. निवृत्ती घेतल्याच्या एक दिवसानंतर, विराट आणि अनुष्का वृंदावनला पोहोचले. दोघांनीही प्रेमानंद महाराजांना नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. प्रेमानंद महाराजांशी बोलताना विराट आणि अनुष्का भावुक झालेले दिसले होते. दोघांनीही महाराजांशी सुमारे ७ मिनिटे खाजगी संभाषण केलं होतं.
दरम्यान, गेल्यावर्षी अयोध्येतील राम मंदिराचा २२ जानेवारी २०२४ रोजी प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला होता. त्यानंतर राम मंदिर सामान्य भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं.