Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट-अनुष्काच्या लग्नाचा डिसेंबरमध्येच उडणार बार; इटलीमध्ये बांधणार साताजन्माच्या गाठी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 18:40 IST

भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा याच महिन्यात विवाहाच्या बंधनात अडकणार असल्याचे बोलले ...

भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा याच महिन्यात विवाहाच्या बंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून दोघांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत. परंतु त्यास दुजोरा मिळत नसल्याने या बातम्या अफवा ठरल्या आहेत. आता पुन्हा दोघांच्या लग्नाची चर्चा रंगली असून ९, १० आणि ११ डिसेंबरला यांच्या लग्नाचा बार उडविला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोघांचा विवाहसोहळा इटलीमध्ये पार पडणार असून, दोन्ही परिवाराकडून त्याबाबतची तयारी पुर्ण झाल्याची चर्चा आहे. सध्या विराट श्रीलंकेविरोधातील मालिकांमध्ये व्यस्त आहे. पुढे ५ जानेवारी रोजी भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौºयावर निघणार आहे. त्यामुळे याच महिन्यात दोघे विवाहाच्या बंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. वास्तविक दोघांकडूनही या वृत्तास दुजोरा दिला गेला नसल्याने ही केवळ चर्चा आहे. दरम्यान, इंडिया टुडेच्या मते ९, १० आणि ११ डिसेंबरपर्यंत फॅशन डिझायनरला बुक करण्यात आले आहे. विराट आणि अनुष्का गेल्या काही काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघे त्यांच्यातील नात्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. परंतु लग्नाविषयी अद्यापपर्यंत दोघांनी फारशी चर्चा केलेली नाही.  दरम्यान, अनुष्का शर्माच्या प्रवक्त्याकडून या वृत्ताचे खंडन करताना पीटीआयला सांगितले की, ११ ते १३ डिसेंबरदरम्यान अनुष्का आणि विराटच्या लग्नाच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. या निव्वळ अफवा आहेत. मात्र या चर्चांना तेव्हा उधाण आले जेव्हा विराटने श्रीलंकेविरोधातील टी-२० मालिकेतून माघार घेतली. शिवाय उपलब्ध माहितीनुसार, दोन्ही परिवारांकडून लग्नाची तयारी केली जात असून, लग्नात मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. आता हे दोघे विवाहाच्या बंधनात अडकतात काय? याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून आहे. विराटच्या क्रिकेट करिअरविषयी सांगायचे झाल्यास, त्याच्याकडे सध्या सर्वाधिक यशस्वी क्रिकेटपटू म्हणून बघितले जाते. श्रीलंकेविरोधातील कसोटी मालिकेत त्याने विक्रमांचे इमले बांधले असून, दक्षिण आफ्रिकेविरोधातही त्याच्याकडून अशाच विश्वविक्रमांची अपेक्षा केली जात आहे, तर दुसरीकडे अनुष्का शर्मा तिच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.