Join us
Daily Top 2Weekly Top 5

'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 18:27 IST

विक्रांत मेसीचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो टॅक्सी ड्रायव्हरसोबत वाद घालताना दिसत आहे. या व्हिडिओत टॅक्सी ड्रायव्हरने अभिनेत्यावर गंभीर आरोपही केले आहेत.

'12th Fail' सिनेमात मुख्य भूमिका साकारून अभिनेता विक्रांत मेसी प्रसिद्धीझोतात आला. या सिनेमातील त्याच्या भूमिकेचं कौतुकही झालं होतं. प्रेक्षकांना विक्रांतने साकारलेली IPS मनोज शर्मा यांची भूमिका प्रचंड भावली होती. 12th Fail मुळे विक्रांतच्या चाहत्या वर्गातही प्रचंड वाढ झाली होती. पण, सध्या विक्रांत एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. 

विक्रांत मेसीचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो टॅक्सी ड्रायव्हरसोबत वाद घालताना दिसत आहे. या व्हिडिओत टॅक्सी ड्रायव्हरने अभिनेत्यावर गंभीर आरोपही केले आहेत. विक्रांत वाढलेलं टॅक्सी भाडं देत नसून शिवीगाळ केल्याचा आरोप ड्रायव्हर करताना दिसत आहे. "सर जेवढं भाडं दाखवत आहे, तेवढं तर तुम्हाला द्याव लागेल", असं टॅक्सी ड्रायव्हर म्हणतो. त्यावर विक्रांत त्याला "जेव्हा प्रवास सुरू केला तेव्हा ४५० रुपये दाखवत होतं," असं म्हणतो. 

"म्हणजे तुम्ही भाडं देणार नाही", असं ड्रायव्हरने म्हटल्यावर विक्रांत त्याला "तू ओरडू नकोस" असं सांगतो. पुढे व्हिडिओत टॅक्सी ड्रायव्हर विक्रांतवर आरोप करताना दिसत आहे. "माझं नाव आशिष आहे. मी एक टॅक्सी ड्रायव्हर आहे. मी यांना त्यांच्या लोकेशनवर सोडलं आहे. पण, आता ते मला पैसे देत नाहीयेत. माझ्याबरोबर वाद घालत आहेत. शिवीगाळ करत आहेत," असं तो ड्रायव्हर म्हणत आहे. त्यावर विक्रांत त्याला "कॅमेरा का काढला आहेस? मला धमकी देतोस का? अचानक कसे पैसे वाढले? हे चुकीचं आहे. अॅपवाल्यांची ही मनमानी चुकीची आहे," असं म्हणताना दिसत आहे. 

विक्रांतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी हे प्रमोशन असल्याचं म्हटलं आहे. तर अनेकांनी विक्रांतचं बरोबर असल्याच्या कमेंट केल्या आहेत. या व्हिडिओबाबत अद्याप अभिनेत्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

टॅग्स :विक्रांत मेसीसेलिब्रिटी