Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्या बालनने म्हटले, ‘मी स्त्रीवादी आहे पण पुरुषविरोधी नाही’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2017 16:22 IST

विद्या बालन सध्या तिच्या आगामी ‘तुम्हारी सुलु’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, यादरम्यान ती अनेक वादग्रस्त वक्तव्य करीत आहे. वाचा सविस्तर!

सध्या विद्या बालन तिच्या आगामी ‘तुम्हारी सुलु’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, ती चित्रपटापेक्षा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेच अधिक चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय लष्करातील एका सैनिकाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून विद्याने खळबळ उडवून दिली होती. आता पुन्हा एकदा विद्याने असेच काहीसे वक्तव्य करीत वादाला फोडणी दिली आहे. तिने म्हटले की, ‘मी स्त्रीवादी आहे, परंतु पुरुषविरोधी नाही.’ विद्याने म्हटले की, ‘मी अशी व्यक्ती आहे, जिच्या मते प्रत्येक महिलेला पुरुषांप्रमाणे आयुष्य जगायला हवे.’पुढे बोलताना विद्याने म्हटले की, ‘स्वत: ला महत्त्व देणे हे निरंतर आव्हान आहे. त्यामुळे तुम्हाला सातत्याने स्वत:ला ही आठवण करून द्यावी लागणार आहे. कारण तुम्हाला त्याची सवय नाही. मी स्वत:ला जेवढे महत्त्व देणार तेवढाच आनंद प्राप्त करणार. कारण मी स्वत:ला आनंदी ठेवल्यास जगातील प्रत्येक आनंद मला मिळविता येईल.’ विद्याचा ‘तुम्हारी सुलु’ येत्या १७ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. सध्या विद्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिवस-रात्र एक करीत आहे. विद्या तिच्या या चित्रपटाबद्दल खूपच कॉन्फिडेंट असल्याचे दिसून येत आहे. विद्याने तिच्या या चित्रपटाबद्दल सांगितले होते की, ‘यावेळेस मला अजिबातच भीती वाटत नाही. मला असे  वाटत आहे की, यावेळेस आम्ही खूपच चांगल्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आतापर्यंत आम्हाला खूपच चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी पसंत केली जात आहेत. त्यामुळे मला आत्मविश्वास आहे की, हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. आम्ही मेहनत करून एक चांगला चित्रपट बनविला आहे. आता हा चित्रपट लोकांनी पसंत करावा, अशी मला अपेक्षा आहे. त्याचबरोबर हा चित्रपट प्रेक्षकांना निराश करणार नाही, असा आत्मविश्वासही आहे. या चित्रपटात विद्या ‘हवा हवाई’ या गाण्यावर थिरकताना बघावयास मिळणार आहे. हे गाणे ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटातील आहे. त्यावेळी श्रीदेवीने या गाण्यावर डान्स करून प्रेक्षकांवर मोहिनी घातली होती.