Join us  

राकेश शर्मा बायोपिकमध्ये शाहरुख खानच्या एक्झिटनंतर हा अभिनेता झळकणार मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 7:16 PM

शाहरुख डॉन ३ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असल्यानेच त्याने राकेश शर्मा यांच्या बायोपिकसाठी नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देशाहरुखने एक्झिट घेतल्यानंतर सिद्धार्थ रॉय कपूर आणि रॉनी स्क्रूवाला यांनी या भूमिकेसाठी नवा चेहरा घेण्याचा निर्णय घेतला होता. या भूमिकेसाठी विकी कौशल आणि कार्तिक आर्यन अशा दोन नावांची चर्चा होती.पण आता विकी कौशलने बाजी मारली असून या चित्रपटात विकी राकेश शर्मा यांच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

अंतराळवीर राकेश शर्मा यांचा बायोपिक गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. आधी या सिनेमाची ऑफर आमिर खानला देण्यात आली होती. मात्र आमिरने या भूमिकेसाठी शाहरुख खानचे नाव सुचवले होते. शाहरुख खान ही भूमिका करणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र आमिरनंतर शाहरुख खानने देखील या सिनेमातून काढता पाय घेतला. शाहरुख या चित्रपटाचा भाग नसणार हे गेल्याच महिन्यात स्पष्ट करण्यात आले होते. फरहान अख्तरचा आगामी डॉन ३ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. शाहरुख या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असल्यानेच त्याने राकेश शर्मा यांच्या बायोपिकसाठी नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.

शाहरुखने एक्झिट घेतल्यानंतर सिद्धार्थ रॉय कपूर आणि रॉनी स्क्रूवाला यांनी या भूमिकेसाठी नवा चेहरा घेण्याचा निर्णय घेतला होता. या भूमिकेसाठी विकी कौशल आणि कार्तिक आर्यन अशा दोन नावांची चर्चा होती. पण आता विकी कौशलने बाजी मारली असून या चित्रपटात विकी राकेश शर्मा यांच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. पीपिंगमुन या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार उरीः द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटातील विकीच्या परफॉर्मन्समुळेच त्याचा या चित्रपटासाठी विचार करण्यात आले आहे आणि विकीने देखील या बिग बजेट चित्रपटासाठी होकार दिला आहे. 

विकीने या चित्रपटासाठी काम करायला सुरुवात केली असून लवकरच तो चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याचे देखील त्यांनी वृत्तात म्हटले आहे. 

अंतराळवीर राकेश शर्मा यांनी २ एप्रिल १९८४ साली सोयुझ टी-११ या यानातून अंतराळात जाणारा पहिला भारतीय म्हणून मान मिळविला होता. ३५ व्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे विद्यार्थी असणारे राकेश शर्मा हे भारतीय वायूदलात टेस्ट पायलट म्हणून १९७० साली सहभागी झाले होते.

उरीः द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाच्या यशानंतर विकी कौशलच्या फॅन फॉलॉव्हिंगमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहात असणार यात काहीच शंका नाही. 

टॅग्स :विकी कौशलशाहरुख खान