ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना पंचत्वात विलीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2017 19:35 IST
ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी बॉलिवूडसह, राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज ...
ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना पंचत्वात विलीन
ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी बॉलिवूडसह, राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. विनोद खन्ना यांचा सर्वांत लहान मुलगा साक्षी खन्ना याने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिली. अंत्यसंस्कारासाठी महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, गुलजार, कबीर बेदी, रंजित, सुभाष घई, ऋषी कपूर, रणधीर कपूर, दिया मिर्जा, रणदीप हुड्डा, चंकी पांडे, उदित नारायण, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह बॉलिवूड, राजकीय क्षेत्रांतील अनेक दिग्गज उपस्थित होते. त्याचबरोबर विनोद खन्ना यांचा मुलगा अक्षय खन्ना, पहिली पत्नी गीतांजली आणि दुसरी पत्नी कविता यादेखील उपस्थित होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत अत्यंत खालावली होती. गिरगाव येथील एचएन रिलायन्स फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मृत्यूच्या अफवाही पसरल्या आल्या होत्या, पण त्यानंतर मुलगा अक्षय खन्नाने स्वत: त्यांची प्रकृती ठीक असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, गुरु वारी त्यांची प्राणज्योत मालवली. विशेष म्हणजे नऊ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ‘दयावान’ आणि ‘कुर्बानी’ चित्रपटांत विनोद खन्नांबरोबर भूमिका करणारे फिरोज खान यांचेही निधन झाले होते. विनोद खन्ना यांनी बॉलिवूडबरोबरच राजकारणातही आपला ठसा निर्माण केला होता. पंजाबच्या गुरदासपूर मतदारसंघातून ते भाजपाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात २००२ मध्ये ते केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री होते. त्यानंतर त्यांनी परराष्ट्र खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारीही पार पाडली. १९६८ ते २०१३ यादरम्यान त्यांनी १४१ चित्रपटांत काम केले आहे. ‘दयावान’ चित्रपटातील त्यांची भूमिका अजरामर आहे. त्याचबरोबर ‘अमर अकबर अँथोनी, द बर्निंग ट्रेन, मेरे अपने, मेरा गाव मेरा देश, गद्दार, जेल यात्रा, इम्तिहान, इन्कार, कुर्बानी, कुदरत या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या.चित्रपटांत पदार्पण केल्यानंतर त्यांनी नकारात्मक भूमिका करायला सुरु वात केली होती, पण त्यानंतर त्यांना चांगल्या आणि आघाडीच्या भूमिका मिळू लागल्या आणि त्यांचे करिअर बहरत गेले. पण करिअर चांगले सुरू असताना अचानक १९८२ मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टी सोडली आणि ओशोंचे भक्त बनले.दरम्यान, विनोद खन्ना यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून, दिवसभर सोशल मीडियावरून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मादी यांनी देखील ट्विट करून विनोद खन्ना यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली.