Join us
Daily Top 2Weekly Top 5

 काही तरी चुकतेय याची जाणीव झाली आणि डॉ. श्रीराम लागू पुन्हा रंगभूमीकडे वळले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 10:00 IST

एका मुलाखतीत डॉ. लागू यांनी रंगभूमीवरच्या प्रेमाची कबुली दिली होती.

ठळक मुद्देवैद्यकीय महाविद्यालयात शिकत असतानाच डॉ. लागू यांना नाटकात काम करण्याची गोडी लागली होती.

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू आज आपल्यात नाहीत. वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले. तब्बल चार दशके मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणाºया डॉ. लागू यांच्या अनेक भूमिका गाजल्या. त्यांनी अनेक हिंदी व मराठी सिनेमांत काम केले. पण ते रंगभूमीवर अधिक रमत. मराठी, हिंदी आणि गुजराती रंगभूमीवर त्यांनी काम केले. एका मुलाखतीत डॉ. लागू यांनी रंगभूमीवरच्या प्रेमाची कबुली दिली होती.

‘मी हिंदी सिनेमात काम करू लागलो आणि हळूहळू रंगभूमी दुरावू लागली. एक वेळ अशी आली की, माझ्याकडे नाटकाकडे अजिबात उसंत नव्हती. त्याक्षणी माझे काहीतरी चुकतेय, ही जाणीव मला बोचू लागली. रंगभूमी माझा श्वास होता. तो थांबता कामा नये, असे मला जाणवले आणि मी पुन्हा रंगभूमीकडे वळलो. दर रविवारी मी नाटक करायचो आणि उर्वरित सहा दिवस सिनेमांत काम करायचो,’ असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले होते.चित्रपटांपेक्षा नाटकात काम करणे कठीण असते. तिथे दिग्दर्शक येऊन कट म्हणत नाही, तिथे रिटेक होत नाहीत, असेही ते या मुलाखतीत म्हणाले होते.

वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असतानाच डॉ. लागू यांना नाटकात काम करण्याची गोडी लागली होती. याचमुळे आपल्या काही सहकाºयांच्या मदतीने पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली. वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर त्यांना कॅनडा आणि इंग्लंडला जावे लागले. १९६०च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. पण भारतात असताना मात्र  पुण्यातील पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि मुंबईतील रंगायन या संस्थेद्वारे त्यांचे रंगमंचावरील काम  सुरू होते. अखेर १९६९मध्ये वसंत कानेटकर लिखित ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकापासून त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. ही भूमिका अजरामर झाली. 

टॅग्स :श्रीराम लागू