Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी'मध्ये दिसली कार्तिक आर्यन-अनन्या पांडेची दमदार केमिस्ट्री, ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 16:18 IST

Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri Trailer: अभिनेता कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडेचा आगामी चित्रपट 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.

अभिनेता कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडेचा आगामी चित्रपट 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या आगामी चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये सध्या मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे, कारण करण जोहर आणि कार्तिक आर्यन पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. जरी करण जोहर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत नसला, तरी त्याच्या 'धर्मा प्रोडक्शन्स' या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. समीर विद्वांसने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहे. समीर विद्वांसने यापूर्वी कार्तिक आर्यनच्या 'सत्यप्रेम की कथा' या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, ज्यामध्ये कियारा अडवाणी नायिका होती.

जवळपास ३ मिनिटं २१ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये कार्तिक आर्यन आयुष्यात बिनधास्त दाखवला आहे. ज्याला ना भूतकाळात रस आहे अन् भविष्यात येणाऱ्या समस्यांमध्ये त्रस्त होऊन त्याला जगायचं नाही. त्याचा फक्त वर्तमानावर विश्वास आहे. ट्रेलरमध्ये अनन्याची एन्ट्री होते, जी सिनेमात लेखिकेच्या भूमिकेत आहे. या ट्रेलरमध्ये रोमान्स आणि कॉमेडीसोबतच दोघांमधील खटके उडतानाही दिसतात. सुरुवातीला प्रत्येक गोष्टीवर चिडणारी अनन्या अखेर कार्तिकच्या प्रेमात पडते. दोघांमधील रोमान्सही फुलताना दिसतो, पण नंतर असा एक टर्न येतो जिथे त्यांच्यात दुरावा निर्माण होण्याची वेळ येते. कार्तिक यासाठी तयार होतो आणि काही भावनिक संवादही साधताना दिसतो. चित्रपटात 'हॅप्पी एंडिंग' आहे, जे सहसा धर्मा प्रॉडक्शनच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य असते.

या ट्रेलरमध्ये अनेक दृश्ये ओळखीची वाटत असली, तरी अनन्याला इम्प्रेस करण्यासाठी कार्तिक ज्या पद्धतीचे 'पंच लाईन्स' मारतो, ते ऐकून ती प्रत्येक वेळी नाक मुरडताना दिसते. ट्रेलरमध्ये परदेशातील सुंदर लोकेशन्स आणि नयनरम्य दृश्ये पाहायला मिळतात. डान्स, गाणी आणि थट्टा-मस्करी यांच्या दरम्यान, शेवटी काही भावनिक क्षणही आहेत ज्यामध्ये जॅकी श्रॉफ यांची झलक पाहायला मिळते

२५ डिसेंबरला चित्रपट होणार प्रदर्शितसमीर विद्वांसच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्सने केली आहे. हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर २५ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून काहींनी म्हटले आहे की, "हा कार्तिकचा नंबर वन चित्रपट ठरेल", तर काहींच्या मते, "चित्रपटात एक गंभीर सामाजिक संदेश आहे ज्यासाठी आपला समाज अजून तयार नाही." काही चाहत्यांनी तर कार्तिक आर्यन आणि अनन्याचा हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट असेल, असा दावा केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kartik Aaryan and Ananya Panday's chemistry shines in new movie trailer.

Web Summary : Kartik Aaryan and Ananya Panday's upcoming film trailer released. The movie showcases romance, comedy, and potential heartbreak. Produced by Dharma Productions, it hits theaters December 25th.
टॅग्स :कार्तिक आर्यनअनन्या पांडे