Join us

श्याम बेनेगल यांच्या 'मुजिब'ला मानवंदना; बांग्लादेशच्या पंतप्रधानांचीही पसंती

By संजय घावरे | Updated: October 26, 2023 15:50 IST

बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांची चित्रपटाला पसंती

मुंबई - ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ तसेच बांग्लादेश चित्रपट महामंडळ यांची सहनिर्मिती असलेल्या 'मुजिब : द मेकिंग ऑफ अ नेशन' या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग मुंबईतील राष्ट्रीय चित्रपट वस्तू संग्रहालयाच्या परिसरात झाले. यावेळी बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह उपस्थितांनी सिनेमाला उभे राहून मानवंदना दिली.

हा चित्रपट मूळ बांग्ला आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये दाखवण्यात आला. यावेळी दिग्दर्शक श्याम बेनेगल, प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते आरिफिन शुवू, चित्रपट विभागाचे सह सचिव आणि एनएफडीसीचे महासंचालक प्रिथुल कुमार, चित्रपटातील इतर कलाकार, तंत्रज्ञ आणि चित्रपटसृष्टीतील नामवंत मंडळी उपस्थित होती. चित्रपटाचा शो संपल्यानंतर सर्वांनी उभे राहून टाळ्या वाजवत बेनेगल यांना मानवंदना दिली. यावेळी बेनेगल म्हणाले की, हा चित्रपट बनवणे माझ्यासाठी निश्चितच एक आनंददायी अनुभव होता. बांग्लादेशाच्या पंतप्रधान आणि शेख मूजीबुर रेहमान यांच्या कन्या शेख हसीना यांनी या चित्रपटाला दिलेली पसंतीची दाद माझ्यासाठी गौरवाचा क्षण असल्याचेही त्यांनी सांगितले.

'मुजिब' हा बहुचर्चित चरित्रपट बांग्लादेशचे जनक आणि उत्तुंग राजकीय नेते शेख मुजिबुर रेहमान यांच्या जीवनावर आधारित आहे. बांग्लादेश मुक्ती युद्धात शेख मुजीबुर रेहमान यांनी केलेला संघर्ष या चित्रपटात प्रामुख्याने मांडला असला तरी, त्याचवेळी त्यांच्या कुटुंबावरचे त्यांचे प्रेम आणि बांधिलकी देखील अत्यंत तरल पद्धतीने दाखवण्यात आली आहे. १३ ऑक्टोबरला बांग्लादेशात रिलीज झालेल्या या चित्रपटाला तिथे प्रेक्षकांचा विक्रमी प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने आजवरचे सर्व विक्रम मोडले आहेत. भारतासह परदेशात, पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनलद्वारे उद्या २७ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे आफिरीन शुवू आणि नुसरत इमरोज तिशा या दोघांनीही मुजीबूर रेहमान आणि त्यांच्या देशावरच्या प्रेमापोटी चित्रपटात नि:शुल्क अभिनय केला असून त्यांनी मानधन म्हणून केवळ एक टक्का घेतला. 

अफिरीन शूवू यांनी शेख रेहमान यांची भूमिका पार पाडली असून यात त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीचे दिवस ते नवनिर्मित बांग्लादेश घडवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. नुसरत इमरोज तिशा यांनी शेख फैजीलातुंनिसा (रेणू,) या शेख मुजीब यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. चित्रपटात, तिचे कुटुंब, संघर्ष, तिची ताकद आणि मूजिबूर यांचे  नेतृत्व घडण्यात त्यांचे योगदान अशा सर्वांचे चित्रण आहे. दोन्ही देशांची माहिती आणि प्रसारण मंत्रालये या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. हा चित्रपट म्हणजे शेख मुजिबूर रेहमान यांना त्यांच्या जनशताब्दीच्या तसेच बांगलादेश निर्मितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वाहिलेली श्रद्धांजली आहे.

टॅग्स :सिनेमामुंबईपंतप्रधान