Join us

देहविक्री करणाऱ्या दोन महिलांची कथा ‘टिकली अँड लक्ष्मी बाँब’ चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 14:08 IST

आदित्य कृपलानीचा २०१५ साली प्रकाशित झालेली कादंबरी ‘टिकली अँड लक्ष्मी बाँब’वर आधारीत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ठळक मुद्दे‘टिकली अँड लक्ष्मी बाँब’चा ट्रेलर प्रदर्शित

लेखक ते निर्माता, दिग्दर्शक असा प्रवास करणारा आदित्य कृपलानीचा २०१५ साली प्रकाशित झालेली कादंबरी ‘टिकली अँड लक्ष्मी बाँब’ला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता यावर त्याच नावाने चित्रपट बनवला असून लवकरच तो नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर लाँच केल्यानंतर या चित्रपटाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

‘टिकली अँड लक्ष्मी बाँब’ चित्रपटाच्या कथेला सुरूवात लक्ष्मी मालवणकरपासून होते. जी २० वर्षांपासून देहविक्रीच्या व्यवसायात कार्यरत असते. या व्यवसायात महिलांना आणण्याचे काम ती करत असते. लक्ष्मीसह आणि पुतूल या दोन देहविक्री करणाऱ्या महिलांच्या धाडसाची कथा यात पाहायला मिळणार आहे. देहविक्री व्यापारात या दोन स्त्रिया स्वत:ची व्यवस्था निर्माण करण्यासाठी धडपडतात.

मुंबईतल्या रस्त्यावर देहविक्रय करणाऱ्या लक्ष्मी आणि पुतूल यादोघीही पुरुषांकडून होणाऱ्या त्रासाला, पोलिसांच्या जाचाला कंटाळलेल्या असतात. त्रास आपल्याला होतो, आपण दु:ख भोगतो मग नेहमीच पुरुषांचा राग, अहंकार का सहन करावा? असा प्रश्न बांगलादेशातून आलेल्या पुतूलला पडतो आणि यातूनच एक छुपे बंड सुरू होते. चंदेरी दुनियेच्या एका काळोख्या साम्राज्यावर राज्य करण्यास त्या यशस्वी होतात का? हे चित्रपटातून पहायला मिळणार आहे. अदित्य कृपलानी दिग्दर्शित या चित्रपटात विभावरी देशपांडे, उपेंद्र लिमये यांसारखे मराठी चेहेरेही यात पाहायला मिळणार आहे. ‘टिकली अँड लक्ष्मी बाँब’ चित्रपटाला बरेच पुरस्कार मिळाले असून हा चित्रपट भारतात प्रदर्शित होण्यापूर्वी अमेरिका व सिंगापूरमध्ये प्रदर्शित होणार आहे. लंडन, बर्मिगम, लिसेस्टर, डर्बी व मॅंचेस्टरमध्ये सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच सिंगापूरमध्ये कार्निव्हल सिेनेमातही हा चित्रपट दाखवला जाणार आहे. 

‘टिकली अँड लक्ष्मी बाँब’ कादंबरीला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.