'जॉली एलएलबी' हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अर्शद वारसी आणि अमृता राव यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण तुम्हाला माहित्येय का, या चित्रपटासाठी अर्शद वारसीच्या भूमिकेसाठी एका मराठमोळ्या अभिनेत्याला विचारण्यात आले होते. पण त्यावेळी या अभिनेत्याने नकार दिला होता. पण आता त्याला हा सिनेमा नाकारल्याचा खूप पश्चाताप होतो आहे.
हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून आपला सर्वांचा लाडका अभिनेता श्रेयस तळपदे आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने 'जॉली एलएलबी' सिनेमाबद्दल सांगितले. त्याने सांगितले की, तो एका क्लासिक चित्रपटाचा भाग कसा बनण्यापासून राहिला. त्याला एक सुवर्णसंधी चालून आली होती, पण त्याने आपल्या मूर्खपणामुळे ती संधी गमावली आणि नंतर त्याला त्याचा खूप पश्चात्ताप झाला.
श्रेयस तळपदेने 'हिंदुस्तान टाइम्स'शी बोलताना सांगितले की, त्याने नकळत 'जॉली एलएलबी'ला नकार दिला होता. तो म्हणाला, ''मला आठवतंय की मी दिग्दर्शक सुभाष (कपूर)जी यांना भेटलो होतो आणि त्यांनी मला एक गोष्ट ऐकवली होती. त्यावेळी, मी इतर प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र होतो, त्यामुळे गोष्टी पुढे सरकल्या नाहीत. काही वर्षांनंतर, जेव्हा 'जॉली एलएलबी' (२०१३) प्रदर्शित झाला, तेव्हा मी तो पाहिला आणि लगेच त्यांना अभिनंदन करण्यासाठी फोन केला. मी त्यांना म्हणालो, 'सर, काय चित्रपट आहे, खूपच छान चित्रपट, मला खूप आवडला, शानदार काम.' आणि त्यांनी (सुभाष सर) फक्त हसून म्हणाले, 'तुला आठवत नाही का? मी हा चित्रपट घेऊन तुमच्याकडे आलो होतो.'' ''आणि अशी मी ही संधी गमावली'' श्रेयसने पुढे सांगितले की, ''मी म्हणालो, 'नाही सर, मला आठवतंय की मी तुम्हाला भेटलो होतो, पण तो हा चित्रपट नव्हता.' ते म्हणाले, 'अगदी, तो जॉलीच होता. मी काही गोष्टी बदलल्या, पण मूळतः तीच कथा होती जी मी तुम्हाला ऐकवली होती.' अभिनेत्याच्या मते, जेव्हा त्यांनी मला पूर्ण गोष्ट सांगितली, तेव्हा मी थक्क झालो. मी त्यांना म्हणालो, 'कृपया सांगा की तो हाच चित्रपट नव्हता.' दुर्दैवाने, तो तोच होता. मला कधीच कळले नाही की मी अशी संधी गमावली होती.''