Join us
Daily Top 2Weekly Top 5

Saif Ali Khan : सैफवर वार केल्यानंतर घोरत झोपला होता हल्लेखोर, जाणून घ्या तो फ्लॅटमध्ये कसा शिरला, कसा पळाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 09:27 IST

Saif Ali Khan : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. हल्लेखोर सैफच्या घरात कुठून आणि कसा घुसला हे पोलिसांनी सांगितले आहे. चाकू मारल्यानंतर तो कोणत्या मार्गाने पळून गेला हेही सांगण्यात आले.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर १६ जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी रविवारी आरोपीला अटक केली. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असे त्याचे नाव असून त्याचे वय ३० वर्षे आहे. पोलिसांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. पोलिसांनी सांगितले की, सैफवर हल्ला केल्यानंतर आरोपी तेथून पळून गेला आणि बस स्टॉपवर झोपला.

आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी अनेक गुपिते उघड केली आहेत. तो सैफच्या घरात कुठून आणि कसा घुसला हे पोलिसांनी सांगितले आहे. चाकू मारल्यानंतर तो कोणत्या मार्गाने पळून गेला हेही सांगण्यात आले आहे. घटनेच्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत आरोपी वांद्रे येथेच होता आणि तिथल्या एका बस स्टॉपवर झोपला होता, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

कोण आहे सैफचा हल्लेखोर?मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला ठाण्यातून अटक करण्यात आली. आरोपी बांगलादेशी नागरिक असून त्याने बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्यानंतर त्याचे नाव बदलून बिजॉय दास असे ठेवले.

हल्लेखोर कोणत्या उद्देशाने सैफच्या घरात घुसला?पोलिसांनी सांगितले की, तो १६ जानेवारीच्या पहाटे वांद्रे येथील 'सतगुरु शरण' इमारतीत असलेल्या बॉलिवूड स्टारच्या फ्लॅटमध्ये चोरीच्या उद्देशाने घुसला होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की,''घटनेनंतर १६ जानेवारीला सकाळी ७ वाजेपर्यंत तो वांद्रे पश्चिम येथील पटवर्धन गार्डनजवळील बस स्टॉपवर झोपला होता. नंतर ट्रेनमध्ये बसून वरळी गाठले.'' 

हल्लेखोर सैफच्या घरात कसा घुसला?अधिकाऱ्यांनी सांगितले की, "आमच्या तपासात असे आढळून आले आहे की, तो सातव्या-आठव्या मजल्यापर्यंत पायऱ्या चढला, त्यानंतर 'डक्ट' भागात प्रवेश केला आणि तेथे लावलेल्या पाईपच्या मदतीने १२व्या मजल्यावर पोहोचला आणि बाथरूमच्या खिडकीतून अभिनेत्याच्या घरात प्रवेश केला. फ्लॅटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तो बाथरूममधून बाहेर आला, जिथे त्याला अभिनेत्याच्या कर्मचाऱ्यांनी पाहिले. यानंतर, घटना सुरू झाल्या ज्याचे रुपांतर हल्ल्यात झाले."

आरोपीने केलेली १ कोटींची मागणीअधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीने घरातील नोकराशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि १ कोटी रुपयांची मागणी केली. त्यांनी सांगितले की, गोंधळ ऐकून सैफ अली खान तिथे पोहोचला आणि त्याला समोरून पकडले. तपशील देताना पोलिस अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, सैफ अली खानला पाहून आरोपी घाबरला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "आरोपीने धक्काबुक्की करत सैफ अली खानच्या पाठीत चाकूने हल्ला केला. नंतर आरोपी आत अडकला आहे असे समजून खानने फ्लॅट बंद केला. मात्र, जिथून तो घरात दाखल झाला होता, त्याच मार्गाने आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. आम्ही त्याच्या बॅगमधून एक हातोडा, स्क्रू ड्रायव्हर, नायलॉन दोरी आणि इतर साहित्य जप्त केले आहे." अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, या गोष्टींमुळे पोलिसांना संशय येतोय की त्याचा गुन्हेगारी इतिहास असू शकतो.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, न्यूज चॅनेलवर प्रसारित झालेल्या बातम्या आणि सोशल मीडियावरील घटनेशी संबंधित पोस्ट पाहिल्यानंतरच आरोपीला कळले की त्याने बॉलिवूड अभिनेत्यावर हल्ला केलाय. दरम्यान, दुसऱ्या अधिकाऱ्यांनी दावा केला की शहजादला पळून जाण्यासाठी वेळ मिळाला कारण वांद्रे पोलिस स्टेशनच्या एका तपास अधिकाऱ्याने खानच्या इमारतीतील सीसीटीव्ही डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर (डीव्हीआर) काढून घेतला आणि तो मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला दिला गेला नाही.

आरोपी मूळचा आहे बांगलादेशचापोलिसांनी सांगितले की शहजाद हा दक्षिण बांगलादेशातील झालोकथी, ज्याला झालाकाथी म्हणून ओळखले जाते, येथील आहे. गेल्या पाच महिन्यांपासून तो मुंबईत असून यादरम्यान त्याने 'हाउसकीपिंग एजेन्सी'सह अनेक ठिकाणी छोटी-मोठी नोकरी केल्याचे आरोपीने सांगितले.

आरोपीवर या कलमांनुसार गुन्हा दाखल"आरोपींवर भारतीय न्याय संहिता, ३३१ (४) (घर फोडणे) आणि इतर गुन्ह्यांसह कलम ३११ (गंभीर दुखापत किंवा खून करण्याच्या हेतूने चोरी किंवा डकैती) आणि  पासपोर्ट कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे," अधिकारी म्हणाले. तो बेकायदेशीररीत्या देशात कसा घुसला, त्याच्याकडे कोणती कागदपत्रे आहेत आणि त्याने ती कशी मिळवली याचा सविस्तर तपास सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :सैफ अली खान