Join us

Thama Teaser: आयुषमान-रश्मिकाच्या 'थमा'चा टीझर रिलीज, नवाजुद्दीनच्या खलनायकाने पाडली छाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 12:27 IST

आयुषमान खुराना - रश्मिका मंदानाच्या आगामी थमाचा टीझर रिलीज झाला आहे. टीझर पाहून सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे

मॅडॉक फिल्म्सने आपल्या यशस्वी 'हॉरर-कॉमेडी' युनिव्हर्सचा विस्तार करत, 'थमा' या आगामी चित्रपटाचा टीझर आज (१९ ऑगस्ट) प्रदर्शित केला आहे. 'स्त्री', 'भेडिया' आणि 'मुंज्या' नंतर या युनिव्हर्समधील हा चौथा चित्रपट असून, यात पहिल्यांदाच हॉरर आणि कॉमेडीसह प्रेमकथेचा थरार अनुभवता येणार आहे. 'ना डर कभी इतना शक्तिशाली था, और ना प्यार कभी इतना ब्लडी!' असे दमदार कॅप्शन देत, निर्मात्यांनी या चित्रपटाच्या वेगळेपणाची झलक दाखवली आहे.

'मुंज्या'चे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केलेल्या 'थमा' या चित्रपटात आयुषमान खुराना, रश्मिका मंदाना, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांची फौज आहे. हा चित्रपट हॉरर-कॉमेडी नसून, एका माणूस आणि एक व्हॅम्पायर यांच्या 'लव्ह स्टोरी'वर आधारित आहे. टीझरमध्ये अनेक चित्तथरारक प्रसंग पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे 'मुंज्या' या सुपरहिट सिनेमाचा मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. याशिवाय चित्रपटात मलायका अरोराचं एक आयटम साँगही पाहायला मिळत आहे.

टीझरमध्ये व्हॅम्पायरच्या गूढ जगाची झलक दिसते. चित्रपटाचे कथानक दोन वेगवेगळ्या कालखंडांवर आधारित आहे - आधुनिक दिल्ली आणि प्राचीन विजयनगर साम्राज्य. यात आयुषमान खुराना एका इतिहासकाराची भूमिका साकारत आहे, जो व्हॅम्पायरवादाच्या पौराणिक मुळांचा शोध घेत आहे. तर, नवाजुद्दीन सिद्दीकी एका प्रतिशोधी व्हॅम्पायरच्या खलनायकी भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट दिवाळी २०२५ मध्ये प्रदर्शित होणार असून, मॅडॉक फिल्म्सच्या या युनिव्हर्समध्ये पहिल्यांदाच 'व्हॅम्पायर'ची एंट्री होत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

टॅग्स :आयुषमान खुराणारश्मिका मंदानाबॉलिवूड