बॉलिवूड म्हटलं की नेपोटिझम आणि नेपो किड्स या दोन गोष्टी कायमच चर्चेत असतात. यावरुन अनेकदा वादही निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. नेपोटिझम आणि आउटसायडर्स यांच्यात कायमच तुलना केली जाते. शिवाय बाहेरुन आल्याने इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागत असल्याचं अनेक सेलिब्रिटींनीही सांगितलं आहे. आता तनिषा मुखर्जीने नेपोकिड्स आणि आउटसायडर्सबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
तनिषाने नुकतीच पिंकविलाला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने बॉलिवूडला आणि नेपो किड्सला ट्रोल करण्याविषयी तिचं मत मांडलं. तनिषा म्हणाली, "एक स्टार किड म्हणून आम्हाला शिक्षा का दिली जाते? आम्हाला नेहमी ट्रोल का केलं जातं? मला याचं फार वाईट वाटतं. माझं फिल्म इंडस्ट्रीवर प्रेम आहे. या इंडस्ट्रीत येणारे आणि इंडस्ट्रीत जन्म घेतलेले लोक मला आवडतात. मला नेपो किड्स आवडतात पण मला हे जाणून घ्यायचंय की आम्हालाच नेहमी टीकचे धनी का बनवलं जातं?".
"मी हे अगदी स्पष्ट सांगू इच्छिते की जेव्हा तुम्ही फिल्मी कुटुंबातून येता तेव्हा तुम्ही सगळ्यात आधी इंडस्ट्रीचा विचार करता. तुम्ही इंडस्ट्रीकडून काही घेण्यासाठी नाही तर इंडस्ट्रीत काहीतरी योगदान देण्यासाठी येता. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता काहीही बनलात तरी तुमचा इंडस्ट्रीला नेहमी देण्याचा विचार असतो. पण, जे लोक बाहेरुन येतात ते इंडस्ट्रीबद्दल प्रामाणिक असतात असं मला वाटत नाही. ते फक्त काहीतरी घेण्यासाठी येतात. हा पण त्यांची मुलं जर इंडस्ट्रीत येऊ इच्छित असतील तर ते नक्कीच इंडस्ट्रीला देण्याचा विचार करतात. इंडस्ट्री कुटुंब असे सिनेमे बनवतात ज्यामुळे इंडस्ट्रीला फायदा होतो", असं तनिषा म्हणाली आहे.