क्रिकेट आणि बॉलिवूडमधील चित्रपट यांना भारतीय जनमानसामध्ये खास स्थान आहे. त्यामुळे क्रिकेट आणि बॉलिवूडमधील चित्रपटांबाबत येथील घराघरापासून ते नाक्यानाक्यांपर्यंत खमंग चर्चा रंगत असतात. त्यामधूनच क्रिकेटपटू आणि अभिनेत्र्यांमधील प्रेमप्रकरणांच्या कहाण्याही रंगतात. भारताचा महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांच्यातील कथित अफेअरची चर्चांही काही दशकांपूर्वी अशीच रंगली होती. त्यावर आता स्वत: शिल्पा शिरोडकर हिने मौन सोडत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
शिल्पा शिरोडकर ही बिग बॉस १८ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यादरम्यान, एका मुलाखतीमधून शिल्पाने तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबाबत बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला आहे. त्याचवेळी तू सचिन तेंडुलकरला डेट करत होतीस का असा प्रश्न तिला विचारला गेला होता. त्यावर ती म्हणाली की, माझा चुलत भाऊ आणि सचिन एकत्र क्रिकेट खेळायचे. सचिन त्यावेळी मोठा क्रिकेटपटू बनला होता. तर माझा एक चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. त्यावेळी मला सचिनला भेटायचं आहे, असे माझ्या भावाला सांगितले होते. एकदा सचिन माझ्या चुलत भावाच्या घरी आला असताना मीही तिथे होते. तसेच त्याला भेटण्यासाठी मी उत्सुकही होते.
शिल्पा शिरोडकर हिने पुढे सांगितले की, मात्र माझं सचिन तेंडुलकरसोबत अफेअर सुरू असल्याच्या चर्चा कुठून सुरू झाल्या, याची मला कल्पना नाही. एका वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिलं होतं. लोक अजूनही त्याबाबत मला विचारतात तेव्हा मी एवढंच सांगते की, आमच्यामध्ये असं काहीही नव्हतं. तसेच या घटनेनंतर मी पुन्हा सचिनला भेटलेही नाही, असेही शिल्पा शिरोडकर हिने सांगितले.