Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर विरूची फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 14:25 IST

 बेनझीर जमादार            यंदाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताने खूपच चांगली कामगिरी केली. त्यामुळे क्रिकेटवेडा असणारा भारत देश सध्या ऑलिम्पिकप्रेमी ...

 बेनझीर जमादार            यंदाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताने खूपच चांगली कामगिरी केली. त्यामुळे क्रिकेटवेडा असणारा भारत देश सध्या ऑलिम्पिकप्रेमी झाला असल्याचे दिसून येतेय. ऑलिम्पिकची चर्चा ऑफिसेस, गल्लीबोळात तर सुरू होती. पण त्याचसोबत सोशल मीडियावरही या खेळाची चांगलीच चर्चा रंगली होती. भारताचा स्टार क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग हा क्रिकेटच्या मैदानावर जितका चांगला बॅटिंग करत असे. तितकीच चांगली बॅटिंग सध्या तो सोशल मिडियावर करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ऑलिम्पिक काळात तर त्याच्याकडून सोशल मीडियावर चौकार षटकारांचा पाऊस सुरू होता. त्याच्या या ट्वीटसची संपूर्ण देशाने भन्नाट मजा लुटली. अमिताभ बच्चन यांच्यापासून अनेकांनी त्याच्या ट्वीटला भरभरून दाद दिली. 
         ऑलिम्पिकचा सोशल मीडियावर श्रीगणेशा लेखिका शोभा डे यांच्या ट्वीटपासून झाला. शोभा डे यांनी ऑलिम्पिक खेळाडूंवर निशाणा साधत एक ट्वीट केले. त्यात त्यांनी म्हटले होते की, रिओ जाओ, सेल्फी लो और खाली हात लौट आओ... त्यांच्या या ट्वीटवर अनेक नेटिझन्सनी नाराजी व्यक्त केली होती. पण काहीच दिवसांमध्येच साक्षी मलिकने कुस्तीमध्ये कांस्य पदक पटकावले आणि संपूर्ण जगभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. साक्षीला मिळालेल्या या विजयानंतर मैदानात षटकार ठोकणाऱ्या विरेंद्र सेहवागनेदेखील सोशल मीडियावर आपल्या स्टाइलने शोभा डे यांना उत्तर दिले. त्याने ट्वीटमध्ये म्हटले, साक्षी तुम्हारे गले में मेडल बहुत शोभा दे रहा है... सेहवागच्या या उत्तराला जबरदस्त लाइक्स मिळाले होते. 
सेहवाग या ट्वीटसाठी चर्चेत असतानाच दीपा कर्माकर जिम्नॅस्टिकमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचली. त्यावेळी सेहवागने त्याच्या खास शैलीत ट्वीट करून दीपा कर्माकरची स्तुती केली. सेहवागने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले होते की, थँक्यू दीपा कर्माकर... ज्या देशात जिम्नॅस्टिकसारख्या खेळासाठी मूलभूत सुविधाही नाहीत, त्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी तू देशाला मध्यरात्री एकत्र आणलंस. आम्हाला तुझा अभिमान आहे. या ट्वीटमधून त्याने अप्रत्यक्षरित्या शासनाला टोमणा मारला होता.   आपल्या देशात क्रिकेट या खेळाचे करोडोने चाहते आहेत. पण यंदा पी.व्ही.सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर यांच्यामुळे ऑलिम्पिक हा खेळदेखील अनेक लोकांनी आवडीने पाहिला. या यशामुळे संपूर्ण देशात जल्लोष सुरू असतानाच ब्रिटिश पत्रकार पीरस मार्गनने एक ट्वीट केले. त्याने ट्वीटमध्ये म्हटले की, १२० कोटींची लोकसंख्या असलेल्या देशाने आॅलिम्पिकमध्ये केवळ दोन पदके मिळवली. तरी ते किती मोठा जल्लोष करत आहेत? हे दुर्देव आहे. त्याच्या या ट्वीटवर सेहवागने खूपच चांगले उत्तर दिले. त्याने यावर उत्तर देताना म्हटले, इंग्लंड हा देश क्रिकेटचा जन्मदाता आहे. पण या देशाने आतापर्यंत एकदाही वर्ल्डकप जिंकला नाही. पण तरीही हा देश अजूनही क्रिकेट खेळतोय. हे दुर्देवी नाही का? सेहवागने दिलेल्या या उत्तरामुळे भारतीयांना प्रचंड आनंद झाला. पण सेहवागच्या या उत्तरावर मॉर्गनने आणखी एक ट्वीट केले. त्याने ट्वीटमध्ये म्हटले, केविन पीटरसन अजून खेळत असता तर इंग्लंडने वर्ल्डकप नक्कीच जिंकला असता. तसेच आम्ही टी २० चा वर्ल्डकप जिंकला आहे आणि त्यावेळी पीटरसनला सामनावीर म्हणून घोषितही करण्यात आले होते. यावर सेहवाग कसला शांत बसतोय. त्याने मॉर्गनला पुन्हा उत्तर दिले. तो म्हणाला, पीटरसन अतिशय महान खेळाडू आहे यात कोणतीच शंका नाही. मात्र तो इंग्लडचा नाही तर दक्षिण आफ्रिकन वंशाचा आहे.                 विशेष म्हणजे तुमच्या या तर्कानुसार इंग्लंडने २००७ सालीच विश्वचषक जिंकणे गरजेचे होते. आम्ही आमचा आनंद साजरा करतोय यात तुम्हाला काही प्रोब्लेम आहे का असा थेट प्रश्नदेखील सेहवागने विचारला होता.  सेहवागचा हा टीवटीवचा सिलसिला सुरू असतानाच सोशल मीडियावर कांस्यपदक विजेती साक्षी मलिकेने सेहवागला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. सेहवागने इथेही हटके स्टाइलने साक्षीला उत्तर दिले. त्याने ट्वीट केले, मी तुला नक्की भेटेन, तुला भेटण्याची वेळही लवकरच सांगेन. पण भेटल्यावर तू माझ्यासोबत कुस्ती करणार नाहीस ना... सेहवागने साक्षीला भेटून तिची इच्छा पूर्ण केली. सेहवाग भेटल्यावर साक्षीने सोशल मीडियावर त्याचे आभारदेखील मानले. ट्विटरवर सुरू असलेल्या सेहवागच्या या फटकेबाजीमुळे सोशल मीडियावर सेहवाग हिरो बनला आहे. काही फेक यूजर्स ट्रॉलनी तर सेहवागला ट्रॉल असोसिएशनचे अध्यक्षपददेखील बहाल केले आहे.