Join us

हृदयविकाराच्या झटक्यानंतर Sushmita Senनं पहिल्यांदाच केलं इन्स्टा लाइव्ह, तब्येतीबाबत माहिती देत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 18:30 IST

Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. तिने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली होती.

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन(Sushmita Sen)ला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. तिने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली होती. तिच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत काळजी घ्यायला सांगितले होते. आता खुद्द सुश्मितानेच तिच्या तब्येतीबद्दल समोर येऊन माहिती दिली आहे.

सुश्मिता सेनने हृदयविकाराचा झटका आल्यानंतर इन्स्टाग्राम लाइव्ह केले होते. या लाइव्हद्वारे चाहत्यांशी संवाद साधत तिने तब्येतीबद्दल माहिती दिली. ती अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाही. मात्र, हळूहळू प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती अभिनेत्रीने दिली आहे. सुश्मिताच्या घशाला इन्फेक्शनही झाले असल्याने लाइव्हमध्ये तिला बोलण्यासही त्रास जाणवत होता. 

सुश्मिता म्हणाली की, माझ्या घशाला इन्फेक्शन झाल्यामुळे असा आवाज येत आहे. पण काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या काही दिवसात तुम्ही माझ्याबद्दल व्यक्त केलेली काळजी आणि प्रेम पाहून मी भारावून गेली आहे. मी स्वत:ला नशीबवान समजते की तुम्ही माझ्यावर इतके प्रेम करता. मी आता बरी आहे. हळूहळू माझ्या तब्येतीत सुधारणा होत आहे.

अनेकांना या परिस्थितीतून जावे लागते. कोणाबरोबर काही ना काही वाईट घडत असते. पण मला मिळालेले प्रेम सगळ्यांनाच मिळते असे नाही. तुमच्या प्रार्थना व प्रेमामुळे आज मी बरी होत आहे. यासाठी मी तुमची आभारी आहे, असेही ती म्हणाली. सुश्मिताने या लाइव्हमधून तिचे कुटुंबीय, निकटवर्तीय आणि डॉक्टरांचेही आभार मानले आहेत. याबरोबच व्यायाम करण्याचा सल्लाही सुश्मिताने दिला आहे. मी व्यायाम करत असूनही, फिटनेसकडे इतके लक्ष देत असूनही मला हृदयविकाराचा झटका आला. हा विचार करुन तुमच्यापैकी काही जण व्यायाम करणं बंद करतील. पण व्यायाम केल्यामुळेच मी यातून बरी होऊ शकले. त्यामुळे नियमित व्यायाम करा, असेही ती म्हणाली.

टॅग्स :सुश्मिता सेन