Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय सारा अली खानमुळे अस्वस्थ होता सुशांत? ‘केदारनाथ’च्या दिग्दर्शकाचा नवा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 15:33 IST

सुशांत  इतका अस्वस्थ होता की, त्याने अभिषेक कपूरसोबत बोलणे थांबवले होते.

ठळक मुद्दे गेल्या १४ जूनला सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.  

सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येने बॉलिवूडच नाही तर अख्ख्या देशाला हादरवून सोडले. सोशल मीडियावर प्रत्येकजण सुशांतच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत आहे. सोबत संतापही आहे. सुशांतच्या मृत्यूला बॉलिवूडमधील घराणेशाही जबाबदार आहे. बॉलिवूडच्या काही लोकांनी सुशांतचे करिअर पद्धतशीरपणे संपवले, असा आरोप होत आहे. याचदरम्यान ‘केदारनाथ’ या चित्रपटाचा दिग्दर्शक अभिषेक कपूर याने एक नवा खुलासा केला आहे.

‘केदारनाथ’ या सिनेमात सुशांत सिंग राजपूत व सारा अली खान मुख्य भूमिकेत होते. सैफ अली खान व अमृता सिंगची लेक साराचा हा पहिला सिनेमा होता. ‘केदारनाथ’मधून साराचा डेब्यू होणार म्हटल्यावर सर्वांच्या नजरा सारावर खिळल्या होत्या. सुशांतकडे मात्र माध्यमांनी दुर्लक्ष केले. सुशांत यामुळे दुखावला होता. या कारणामुळे तो अस्वस्थ होता. इतका की, अभिषेक कपूर यांच्यासोबत बोलणे त्याने थांबवले होते.अभिषेक कपूर याने एका मुलाखतीत याबद्दल सांगितले.  त्याने सांगितले की, ‘केदारनाथ’ शूटींग सुरु झाले अगदी तेव्हापासूनच सुशांत अस्वस्थ होता. तो प्रामाणिकपणे काम करत होता. पण मीडियाचा सगळा फोकस सारावर आहे, हे कुठेतरी त्याला अस्वस्थ करत होते.

सुशांतने कधीच सेटवर कसले नखरे केले नाहीत. शूटिंगसाठी साराला त्याला पाठीवर उचलून घ्यावे लागले होते. हा सीन देताना अनेक रिटेक द्यावे लागले. पण सुशांतने रिटेकसाठी कधीच नकार दिला नाही. चित्रपट रिलीज झाल्यावर माध्यमांनी सुशांतकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आणि साराचा चित्रपट असा बोलबाला केला. याचे त्याला वाईट वाटले. हेच कारण होते की, चित्रपटानंतर मी अनेकदा सुशांतशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याने कधीच मला उत्तर  दिले नाही. त्याने ५० वेळा तरी त्याचा फोन नंबर बदलला असेल. ‘केदारनाथ’चे श्रेय सुशांतच्या पदरी पडले नाही. आपल्याला डावलण्यात आल्याचे त्याला वाटत असावे. मी त्याला मेसेज केला. पण त्याने त्याला उत्तरच दिले नाही. त्याच्या वाढदिवसानिमित्त मी त्याला शुभेच्छा देण्यासाठी मेसेज केला. तेव्हासुद्धा त्याने काहीच उत्तर दिले नाही. त्यानंतर मीसुद्धा फार प्रयत्न केले नाहीत.’ 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतसारा अली खान