‘या’ सुपरस्टारने अजूनही बघितला नाही ‘बाहुबली-२’
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 14:00 IST
‘बाहुबली-२’ रिलीज होऊन तब्बल २० दिवस पूर्ण झाले आहेत. अशातही बॉक्स आॅफिसवर ‘बाहुबली-२’चा दबदबा कायम आहे. गेल्या आठवड्यात रिलीज ...
‘या’ सुपरस्टारने अजूनही बघितला नाही ‘बाहुबली-२’
‘बाहुबली-२’ रिलीज होऊन तब्बल २० दिवस पूर्ण झाले आहेत. अशातही बॉक्स आॅफिसवर ‘बाहुबली-२’चा दबदबा कायम आहे. गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या ‘सरकार-३’ आणि ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटांचा बाहुबलीमुळे अक्षरश: चुराडा झाला. कारण देशातील बहुतांश भागांमध्ये आजही ‘बाहुबली-२’ हाउसफुल चालत आहे. थोडक्यात काय तर प्रत्येकालाच सध्या बाहुबली बघण्याचे वेड लागले आहे. मात्र बॉलिवूडच्या एका सुपरस्टार्सने अद्यापपर्यंत ‘बाहुबली-२’ बघितला नाही. परंतु त्यावर प्रतिक्रिया नक्की दिली. आता तुम्ही म्हणाल की, बॉलिवूडचा हा सुपरस्टार कोण? तर त्याचे नाव शाहरूख खान असे आहे. वास्तविक पाहता शाहरूख नेहमीच भारतीय सिनेमाच्या बदलत्या स्वरूपावर भर देत त्याला आणखी सर्वोच्च शिखरावर घेऊन जाण्याविषयी बोलताना दिसून येतो. हाच धागा पकडून शाहरूखने ‘बाहुबली-२’वर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले की, ‘यशाचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘बाहुबली’ होय. मात्र या यशामागे निर्मात्यांच्या हिमतीलाही दाद द्यायला हवी. कारण हिंमत केल्याशिवाय यश प्रतिष्ठा मिळत नाही.’ शाहरूखने हे वक्तव्य ‘बाहुबली-२’ न बघताच दिले असल्याने, बाहुबलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. पुढे बोलताना शाहरूखने म्हटले की, मी बाहुबलीचा पहिला भाग बघितला आहे. मात्र दुसरा भाग अजूनही मी बघू शकलो नाही. हा चित्रपट खरोखरच प्रेरणादायी असल्याचेही त्याने म्हटले. आयएएनएस या न्यूज एजन्सीला शाहरूखने ही प्रतिक्रिया दिली. यावेळी त्याने, ‘केवळ कमाईच नव्हे तर दूरदर्शीपणा आणि विचारांनाही या चित्रपटाने यश मिळवून दिले आहे. जर तुम्ही हिंमत करणार नाही, तर तुम्हाला प्रतिष्ठाही मिळणार नाही. बाहुबलीमध्ये हे सर्व काही असल्यानेच त्याचे यश सर्वदूर स्पष्टपणे दिसत आहे. बाहुबलीचे कौतुक करताना तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने जर तुम्ही मोठा चित्रपट अन् तुमचे मोठे स्वप्न अधिकाधिक लोकांना विकू इच्छित असाल तर त्यासाठी तुमच्यात बळ असणे गरजेचे आहे. त्यासाठी तुमच्यात बोल्ड अंदाज असायला हवा, जो बाहुबलीमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. एस. एस. राजामौली नेहमीच प्रेरणादायी राहिले आहेत. कारण त्यांनी त्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये वेगळेपण दाखवून दिले आहे. बॉलिवूडमध्येही असे निर्माते आहेत, जे अशाप्रकारचे धाडस करण्याची ताकद ठेवतात.