कर्नाटक सरकारने गेल्या आठवड्यातच सनी लिओनी हिला न्यू इयर झटका देताना बंगळुरूसह राज्यातील अन्य भागांत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कार्यक्रम करण्यास परवानगी नाकारली होती. कर्नाटक रक्षा वेदिके या संघटनेसह अन्य काही संघटनांनी सनीला राज्यात येऊ देण्यावरून विरोध केल्याने कर्नाटक सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. आता याप्रकरणावरून सनी लिओनी हिने प्रतिक्रिया दिली असून, तिने कर्नाटक सरकारला रोखठोक असे उत्तर दिले आहे. होय, सनीने ट्विटच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना सांगितले की, ‘लोकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव मी कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतला आहे.’कर्नाटक रक्षा वेदिके (केआरवी) आणि अन्य संघटनांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी होणाºया सनी लिओनीच्या कार्यक्रमाला विरोध केला होता. कर्नाटक रक्षा वेदिकेच्या युवा सेनेने सरकारला धमकी दिली होती की, जर सनीचा न्यू इयर इव्हेंट रद्द केला नाही तर आम्ही सामूहिक आत्मदहन करणार आहोत. यावेळी या संघटनांकडून सनीच्या विरोधार्थ राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलनेही केली गेली. दरम्यान, याप्रकरणावर सनीने ट्विट करताना लिहिले, ‘बंगळुरूच्या पोलिसांनी हे स्पष्ट केले की, ते सनी आणि न्यू इयर कार्यक्रमाला उपस्थित राहणाºया लोकांचे संरक्षण करू शकणार नाहीत. या सर्व परिस्थितीचा विचार करून मी कार्यक्रम करणार नाही. माझी अशी इच्छा आहे की, सर्वांची नव्या वर्षाची सुरुवात चांगली आणि सुरक्षित व्हावी.’
पुढे सनीने लिहिले की, ‘ज्या लोकांनी मला विरोध केला अन् ज्यांनी त्यांना साथ दिली त्या सर्वांचेच आभार! कधी कोणाला तुमच्याविषयी बोलण्याची संधी द्यायला नको. आपला आवाज स्वत:च उठवायला हवा. आपले निर्णय स्वत:च घ्यायला हवेत. तुम्ही या देशाचे तरुण असून, न्यू इंडिया आहात. गर्वाने उभे राहा अन् एकत्र या. तुम्हा सर्वांना माझ्या प्रेमळ शुभेच्छा!’ सनीचे हे ट्विट जरी भावुक असले तरी तिने सरकार आणि यंत्रणेवर चांगलाच निशाणा साधला. तिच्या या ट्विटमधून सरकारची असमर्थता स्पष्टपणे दिसून आली.