सुनील शेट्टी हा लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता. अभिनयासोबतच सुनील शेट्टी त्याच्या बेधडक स्वभावासाठीही ओळखला जातो. एखाद्या विषयावर तो बिनधास्तपणे त्याचं मत मांडतो. काही दिवसांपूर्वीच लेक अथिया शेट्टीच्या डिलिव्हरीनंतर अभिनेत्याने सी-सेक्शनबाबत वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता पुन्हा एकदा सुनील शेट्टी त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. "नवऱ्याच्या करियरसाठी बायकोने मुलांना सांभाळावं", असं सुनील शेट्टीने म्हटलं आहे.
सुनील शेट्टीने पिंकविलाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने सध्याच्या लग्नसंस्थेवर भाष्य केलं. काळानुसार लग्नाबद्दलची व्याख्या बदलली आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना सुनील शेट्टी म्हणाला, "आजकालच्या मुलांमध्ये संयम नाही. लग्न म्हणजे काही वर्षांनंतर फक्त एक तडजोड असते. तेव्हा तुम्हाला एकमेकांना समजून घ्यावचं लागतं आणि एकमेकांसाठी जगावं लागतं".
पुढे तो म्हणाला, "त्यानंतर तुम्हाला मुलं होतात. आणि बायकोने हे समजणं खूप महत्त्वाचं आहे की नवरा करिअर बनवत असेल तर मी मुलाला सांभाळेन. अर्थात, पतीही मुलाची काळजी घेणार आहे. पण, आजकाल सगळ्याच गोष्टींमध्ये खूप प्रेशर आहे". सुनील शेट्टीच्या या वक्तव्यानंतर त्याला ट्रोल केलं जात आहे. या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला फटकारलं आहे.
"काहीवेळेस शांत बसणं हुशारपणाचं असतं...PR टीमने सांगितलं नाही का? तुझ्या जावयाकडून काहीतरी शिकायला हवं" असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "टिपिकल भारतीय काकांसारखी विचारसरणी", असं म्हटलं आहे. "याचे लूक्स किंवा भूमिकांवर जाऊ नका. त्याच्या वयाप्रमाणे विचारही तसेच होत चालले आहेत", असंही काहींनी म्हटलं आहे.