जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे केवळ देशभरातूनच नाही तर जगभरातून संताप व्यक्त होत आहे. सेलिब्रिटीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करताना दिसत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने मोठा निर्णय घेतला आहे.
या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या अबीर गुलाल सिनेमाला भारतात बंदी घालण्यात आली आहे. तर प्रभासच्या फौजी सिनेमावरुनही वाद सुरू आहेत. अशातच सुनील शेट्टीचा आगामी सिनेमा 'केसरी वीर'च्या निर्मात्यांनीही मोठा निर्णय घेतला आहे. दहशतवादी हल्लायनंतर आता 'केसरी वीर : लीजेंड्स ऑफ सोमनाथ' हा सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाही. नुकतीच सिनेमाच्या टीमकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. "या हल्ल्यानंतर मी माझ्या विदेशी वितरण कंपन्यांना सांगितलं आहे की कोणत्याही परिस्थिती माझा सिनेमा पाकिस्तानात रिलीज होता कामा नये. माझा सिनेमा पाकिस्तानात रिलीज व्हावा असं मला वाटत नाही", असं निर्माते कनु चौहान यांनी सांगितलं आहे.
'केसरी वीर : लीजेंड्स ऑफ सोमनाथ' या सिनेमात सुनील शेट्टी मुख्य भूमिकेत आहे. १४व्या शतकात परकियांचं आक्रमण झाल्यानंतर सोमनाथ मंदिरांचं रक्षण करणाऱ्या वीर योद्धांची गाथा यातून सांगण्यात येणार आहे. या सिनेमात सूरज पांचोली, विवेक ओबेरॉय, आकांक्षा शर्मा अशी स्टारकास्ट आहे. येत्या २९ एप्रिलला सिनेमाचा ट्रेलर सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. पाकिस्तान सोडून हा सिनेमा भारतासह अमेरिका, युकेमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे.