असे होते सचिन पिळगांवकर त्यांच्या बालपणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 15:46 IST
सचिन पिळगांवकर हे नाव मराठी आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीतही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांनी मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. ...
असे होते सचिन पिळगांवकर त्यांच्या बालपणी
सचिन पिळगांवकर हे नाव मराठी आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीतही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांनी मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शन, निर्मिती, गायन या क्षेत्रातही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज त्यांचा वाढदिवस असून त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रसिद्ध गायिका राणी वर्मा यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.राणी वर्मा आणि सचिन पिळगांवकर हे लहानपणापासून एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. याविषयी राणी वर्मा सांगतात, माझे वडील आणि सचिनचे वडील हे दोघेही फिल्म इंडस्ट्रीशी निगडित होते. ते दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. त्यामुळे सचिनला आम्ही लहानपणापासून ओळखतो. आम्हा भावंडांसोबत सचिनची लहानपणापासून घनिष्ट मैत्री होती. तो आम्हाला सगळ्यांना एखाद्या भावासारखा आहे. रक्षाबंधनला आवर्जून तो आमच्या घरी येत असे. तो लहानपणापासूनच खूप मस्तीखोर आहे. आमच्या घरी तो नेहमी यायचा. तो जास्तीत जास्त वेळ आमच्याच घरात असायचे. त्यामुळे सचिनच्या घरातले त्याला म्हणायचे, बाबा आता बस्स झाले... आता तरी घरी ये... सचिन लहानपणापासूनच खूप चांगला गायक, डान्सर आहे. तो लहानपणापासूनच तिसरी मंजिल या चित्रपटातील आजा आजा प्यार तेरा... या गाण्यावर खूप छान नाचत असे. त्याच्यासोबतच्या असंख्य आठवणी आहेत. आमचे खूप सारे फ्रेंड्स त्याचेही फ्रेंड्स झाले होते. त्यामुळे आम्ही आजही भेटलो की, तो मला त्यांच्याविषयी विचारतो. आज कामाच्या व्यग्रतेमुळे आम्हाला नियमित भेटणे शक्य होत नाही. पण वेळात वेळ काढून आम्ही एकमेकांना भेटायचा प्रयत्न करत असतो. Also Read : जाणून घ्या सचिन पिळगांवकर यांना शोले या चित्रपटासाठी किती मानधन मिळाले होते