Join us

'गोलमाल' फेम अभिनेता मुरली शर्माची पत्नी आहे प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 06:00 IST

फार कमी लोकांना माहित आहे की अभिनेता मुरली शर्मा (Murli Sharma)ची पत्नीदेखील मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

अभिनेता मुरली शर्मा (Murli Sharma)ने अभिनय कौशल्याने बॉलिवूडच नाही तर साउथ इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. त्याने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. प्रभासच्या साहो, राधेश्याम या चित्रपटात देखील तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. त्याने हिंदीसोबतच अनेक साऊथच्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. मुरलीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी तो मीडियापासून दूर राहणे पसंत करतो. मुरली शर्माची पत्नीदेखील मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे, हे फार कमी लोकांना माहित आहे.

मुरली शर्माच्या पत्नीचे नाव अश्विनी कळसेकर (Ashwini Kalsekar) असून तिने मराठी चित्रपटांतून तिच्या कारकीर्दीची सुरुवात केली. तिने तिच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला मराठी मालिकांमध्ये देखील काम केले. त्यानंतर तिला शांती या हिंदी मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना आवडली. पण ती सीआयडी या मालिकेतून घराघरात पोहचली. या मालिकेनंतर ती कसम से या मालिकेतही झळकली. या मालिकेसाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. तिने मुसाफिर, अपहरण, फूंक, गोलमाल यांसारख्या बऱ्याच हिंदी चित्रपटात काम केले आहे. याशिवाय तिने पोश्टर बॉइज, सुंबरान, बघतोस काय मुजरा कर आणि वेडिंगचा शिनेमा या मराठी चित्रपटात काम केले आहे.

अश्विनी कळसेकर आणि मुरली शर्मा यांनी २००९ साली लग्नगाठ बांधली. अश्विनीचे पहिले लग्न अभिनेता नितेश पांडेसोबत झाले होते. त्याने साया, एक रिश्ता साझेदारी का या मालिकांमध्ये तर ओम शांती ओम या चित्रपटात काम केले आहे. त्या दोघांचे १९९८ मध्ये लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर नितेशने अभिनेत्री अर्पिता पांडेसोबत लग्न केले. घटस्फोटानंतर काही वर्षांनी मुरली अश्विनी कळसेकरच्या आयुष्यात आला. त्या दोघांची चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर लग्नात झाले.