Join us

मौलवीच्या फतव्याला सोनू निगमचे उत्तर; मुस्लिम मित्राकडून केले मुंडण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 16:14 IST

गायक सोनू निगम आणि मुस्लीम समुदाय हा वाद आता विकोपाला जात असतानाचे चित्र दिसत आहे. काही तासांपूर्वी मौलवीने सोनू ...

गायक सोनू निगम आणि मुस्लीम समुदाय हा वाद आता विकोपाला जात असतानाचे चित्र दिसत आहे. काही तासांपूर्वी मौलवीने सोनू निगमचे मुंडण करून त्याला जुन्या चपलांचा हार घालणाºयाला दहा लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली होती. त्यावर सोनू निगमने आपल्या मुस्लीम मित्राकडून स्वत:चे मुंडण करीत या वादाला नवे वळण दिले आहे.  सोनूने आपल्या ट्विटनंतर निर्माण झालेल्या वादाविषयी प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्ट केले की, मी कुठल्याही धर्माच्या विरोधात नसून, मी माझ्या मुस्लीम मित्रांवर खूप प्रेम करतो. सोनूने म्हटले की, कुठल्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखविण्याचा माझा उद्देश नव्हता. माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ लावल्याचे मला दु:ख वाटते. मौलवीने माझ्याविषयी काढलेला फतवा पूर्ण करताना मी स्वत:चे मुंडण करीत आहे. यासाठी मी माझा मुस्लीम मित्र आलिम याची निवड केली आहे. आलिम हकीम सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट आहे. सोनू निगमने पुढे बोलताना म्हटले की, मी विचारही करू शकत नाही की, एवढ्याशा विषयावर अशाप्रकारचे वळण दिले जाऊ शकते. आज बुधवारी सकाळी पश्चिम बंगालच्या एका मौलवीने सोनू निगमचे मुंडण करण्याचे आदेश दिले होते. जो सोनू निगमचे मुंडण करून त्याला चपलांचा हार घालेल त्याला १० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याचे या मौलवीने म्हटले होते. त्यावर सोनू निगमने ट्विट करून म्हटले होते की, आज दुपारी २ वाजता आलिम येणार आणि माझे मुंडण करणार आहे. त्यामुळे मौलवीने दहा लाख रुपये तयार ठेवावेत. यावेळी सोनूने त्याच्या पुढच्या ट्विटमध्ये प्रेसलाही निमंत्रण दिल्याचे म्हटले होते. वास्तविक डीएनएच्या एका गुप्त माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या अल्पसंख्याक युनायटेड काउन्सिलच्या एक वरिष्ठ सदस्याने असा फतवा काढला होता की, जो कोणी सोनू निगमचे मुंडण करून त्याला चपलांचा हार घालून देशभर त्याची वरात काढेल त्या व्यक्तीला दहा लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. याच फतव्याला आवाहन देताना सोनू निगमने ट्विट करून मी माझ्या मुस्लीम मित्राकडून स्वत:चे मुंडण करणार असल्याचे सांगत दहा लाख रुपये तयार ठेवा असे म्हटले होते. ALSO READ :  मौलवी, १० लाख तयार ठेव; सोनू निगमचे फतव्याला दिले उत्तर!- ​tweets against azaan : सोनू निगमला टिवटिवाट भोवला; एफआयआर दाखल, फतवा जारी!दरम्यान, सोनू निगमने या फतव्याला आवाहन देताना प्रेस कॉन्फरन्सचे आयोजन करीत मुंडण करून त्याठिकाणी एण्ट्री केली. त्यामुळे सगळेच काही काळ अवाक् झाले होते. सोनूने म्हटले की, मी यासर्व प्रकाराला गुंडगिरी म्हणून बघतो. कोणीतरी आपल्या धर्माच्या प्रचारासाठी अशाप्रकारचा आधार घेत असेल तर ती गुंडगिरीच म्हणावी लागेल. उत्सवादरम्यान मी कुठल्या धर्माचे किंवा उत्सवाचे नाव घेणार नाही. परंतु हे लोक रस्त्यावर नाचून इतरांना जो त्रास देतात तो गैर आहे. वास्तविक यांना धर्माचे काहीही देणेघेणे नसते केवळ दारू पिण्यासाठी यांना निमित्त हवे असते. ही त्यांची दादागिरी नव्हे का? जर मी अशाप्रकारचा मुद्दा उपस्थित करीत असेल तर तुमच्यासारख्या बुद्धिजीवी लोकांनी हे समजून घ्यायला नको का? असेही सोनू निगमने प्रश्न उपस्थित केले.पुढे बोलताना सोनूने म्हटले की, काही लोकांनी मला असे म्हटले की, तू तुझ्या ट्विटमध्ये मोहम्मद का लिहिले? ‘मोहम्मद साहब’ असे का लिहिले नाही. तर यावर मला असे म्हणायचे की, इंग्रजी भाषेत असं लिहिता येत नाही. जसे की हिंदीत आपण श्रीकृष्ण असे लिहितो तर इंग्रजी भाषेत आपण कृष्णा असे लिहितो. त्यामुळे अशा लहान-सहान बाबींकडे परिपक्वतेच्या दृष्टीने बघायला हवे.यावेळी सोनू निगमने स्वत:हून केलेल्या मुंडणविषयीदेखील त्याला विचारण्यात आले, त्यावर सोनूने म्हटले की, मी हे एखाद्यास कमी लेखण्यासाठी केले नाही. मी जे काही केले ते इतरांसाठी उदाहरण बनावे याकरिता केले आहे. मी माझे मुंडण आलिम हकीम या मुस्लीम व्यक्तीकडून करून घेतले. मी मुस्लिमांविरोधात नाही. मी खूपच धर्मनिरपेक्ष आहे. मी काही मौलानाने दिलेले चॅलेंज पूर्ण करण्यासाठी हे सर्व केले नाही, असेही त्याने स्पष्ट केले.