केदार शिंदे दिग्दर्शित अगं बाई अरेच्चा! सिनेमा आठवतोय. २००४ साली आलेला हा सिनेमा आजही अनेकांच्या आवडत्या सिनेमांच्या यादीत सामील असेल. बायकांच्या मनात ओळखू येणाऱ्या हिरोची ही कथा होती. अभिनेता संजय नार्वेकरने सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. तर याच सिनेमा सोनाली बेंद्रेने (Sonali Bendre) 'छम छम करता है ये नशीला बदन' हे आयटम साँग केलं होतं जे आजही लोकप्रिय आहे. या गाण्याच्या शूटवेळी सोनाली गरोदर होती असा खुलासा तिने नुकताच केला.
सोनाली बेंद्रेच्या घरी नुकतीच फराह खान (Farah Khan) आली होती. फराह तिच्या युट्यूब चॅनलवर कुकिंग शो करते ज्यात ती सेलिब्रिटींच्या घरी जाते आणि त्यांची स्पेशल रेसिपी दाखवते. नुकतीच ती सोनाली बेंद्रेच्या घरी गेली होती. दोघींनी गप्पा मारल्या आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी फराह म्हणाली, "आपण दोघींनी अनेक गाणी एकत्र केली आहेत. 'आँखो के बसे हो तुम', 'मेरे महबूब मेरे सनम'. आपण एक गाजलेलं मराठी गाणंही केलं छम छम करता है". यावर सोनाली म्हणाली, "त्या गाण्याच्या वेळी मी गरोदर होते आणी मलाच माहित नव्हतं."
यानंतर फराह म्हणाली, "तरीच मला वाटलेलं सोनाली तेव्हा एकदम जाड दिसत आहे जी आधी एकदम बारीक दिसायची. फिल्मी हिरोईन दिसत आहे. आता पंजाबी घरात खातेय त्याचाच परिणाम असेल. तेव्हा सोनाली म्हणाली, "मी पंजाबीशी लग्न केलं म्हणून माझं खाणं वाढलं असेल असं तुला वाटलं. मलाही कळत नव्हतं की माझं पोट का नाही कमी होते. पण नंतर मी प्रेग्नंट असल्याचं मला कळलं. मला माहितच नव्हतं."
सोनाली बेंद्रेने २००२ साली फिल्ममेकर गोल्डी बहलसोबत लग्नगाट बांधली. २००५ साली तिने मुलाला जन्म दिला. यानंतर सोनाली स्क्रीनवरुन गायब झाली. ती सध्या डान्स रिएलिटी शोचं परीक्षण करते. सोनालीच्या सौंदर्यावर आजही चाहते फिदा आहेत.