फॅशन शोमध्ये सोनल चौहानशी गैरवर्तणूक; शमिता शेट्टीशीही घातली हुज्जत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2017 14:41 IST
‘जन्नत’ फेम अभिनेत्री सोनल चौहान हिने आरोप केला की, एका फॅशन कार्यक्रमादरम्यान आयोजकांनी तिच्याशी गैरवर्तणूक करीत तिला त्रास देण्याचा प्रयत्न ...
फॅशन शोमध्ये सोनल चौहानशी गैरवर्तणूक; शमिता शेट्टीशीही घातली हुज्जत!
‘जन्नत’ फेम अभिनेत्री सोनल चौहान हिने आरोप केला की, एका फॅशन कार्यक्रमादरम्यान आयोजकांनी तिच्याशी गैरवर्तणूक करीत तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. सोनलच्या या आरोपामुळे शोचे आयोजक अडचणीत सापडले असून, त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. शोमध्ये सोनलला शो स्टॉपर म्हणून आमंत्रित केले होते. या कटू प्रसंगाचा सामना केवळ सोनललाच करावा लागला असे नाही तर, आयोजकांनी अभिनेत्री शमिता शेट्टीलादेखील अपशब्दाने हिणवल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर शमितासोबत त्यांनी हुज्जतही घातल्याने हा शो सध्या वादाच्या भोवºयात सापडला आहे. शमिताच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयोजक शमिता शेट्टी आणि तिच्या टीमसोबत खाण्याच्या बिलावरून हुज्जत घालत होते. आयोजकांच्या मते आम्ही शमिताला आमंत्रित केले होते, तिच्या टीमच्या खानपाणाचा आम्ही कशाचा विचार करायचा. परंतु शमितासोबत जर तिची टीम येत असेल तर त्यांचीही व्यवस्था आयोजकांनी करणे अपेक्षित होते, या कारणांवरून आयोजकांनी तिच्याशी हुज्जत घातली. एवढेच नव्हे तर तिला शिव्यांची लाखोलीही वाहिल्याचे समोर आले आहे. दरम्यान सोनल चौहान आणि शमिता शेट्टी यांनी, अशाप्रकारच्या कार्यक्रमात हजेरी लावण्यापूर्वीच सर्व व्यवस्थांची माहिती घेऊनच निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर आयोजकांची पार्श्वभूमी जाणून घेतल्यानंतरच त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावायची की नाही, याविषयीचा विचार करणार असल्याचे म्हटले आहे. या दोघींबरोबर झालेल्या या गैरप्रकारचे पडसाद अद्यापपर्यंत पोलिसांपर्यंत पोहचले नसले तरी, त्यांनी केलेल्या आरोपांमुळे आयोजकांची बदनामी होत आहे, हे निश्चित. मात्र अशातही आयोजकांनी या दोघींचे आरोप निराधार असल्याचे सांगत, या विषयावर अधिक काही बोलणे टाळले आहे. सोनल बॉलिवूड पडद्यापासून दूर असली तरी, सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रि य असते. तिचा चाहता वर्गही चांगला आहे. एक चाहता तिला दररोज तब्बल एक हजार गुलाबांचा गुच्छ भेट म्हणून पाठवत असल्याचे नुकतेच समोर आले होते. तिच्या मुंबईतील वर्सोवा येथील निवासस्थानी तिचा चाहता एक हजार गुलाबांचा गुच्छ पाठवायचा. आपले नाव गुपित ठेवलेल्या या सोनलच्या चाहत्याने आतापर्यंत आठ हजार गुलाबं पाठवली आहेत. चॉकलेट डेच्या दिवशीदेखील या चाहत्याने सोनलला गुलाबांचा नजराणा भेट केला होता. सोनलने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या चाहत्याने पाठविलेल्या गुलाबांच्या गुच्छासोबतचे फोटो पोस्ट केले होते. याशिवाय, तिने आपल्या चाहत्याचे आभार देखील व्यक्त केले होते. सोनल अरबाज खानसोबत बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार असल्याच्या चर्चा देखील रंगत आहेत. अरबाजने सोनल सोबतचा एक सेल्फी शेअर करत सोनलसोबत स्क्रि न शेअर करणार असल्याचे संकेत दिले आहेत. छायाचित्राखाली अरबाजने चित्रीकरणात व्यस्त असल्याचे म्हटले होते. मात्र या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. ‘जन्नत’नंतर अभिनेता नील नितीन मुकेशसोबतच्या ‘थ्री जी’ चित्रपटात सोनल दिसली होती.