Join us

'सन ऑफ सरदार २' येणार! अजय देवगणच्या सिनेमाचा १३ वर्षांनी सीक्वल, काही दिवसांतच होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 11:47 IST

तब्बल १३ वर्षांनी 'सन ऑफ सरदार' सिनेमाचा सीक्वल येत आहे. 'सन ऑफ सरदार २'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.

अजय देवगणच्या सुपरहिट ठरलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'सन ऑफ सरदार'. २०१२ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा लोकप्रिय ठरला होता. तेलुगु चित्रपट 'मरयदा रमन्ना'चा हा रिमेक होता. या सिनेमात अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत होते. आता तब्बल १३ वर्षांनी 'सन ऑफ सरदार' सिनेमाचा सीक्वल येत आहे. 'सन ऑफ सरदार २'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.

'सन ऑफ सरदार २'च्या पोस्टरवर अजय देवगणचा पंजाबी अवतार पाहायला मिळत आहे. या पोस्टरमध्ये अभिनेता डॅशिंग आणि रुबाबदार दिसत आहे. अजय देवगण दोन रणगाड्यांवर उभा असल्याचं दिसत आहे. 'सन ऑफ सरदार २ : द रिटर्न ऑफ द सरदार' असं सिनेमाचं नाव असणार आहे. विजय अरोरा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

'सन ऑफ सरदार २'साठी प्रेक्षकांना जास्त वाट पाहण्याची गरज नाही. कारण, पुढच्याच महिन्यात म्हणजे जुलैमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. २५ जुलैला 'सन ऑफ सरदार २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'सन ऑफ सरदार'मध्ये अजय देवगणसोबत सोनाक्षी सिन्हा दिसली होती. मात्र 'सन ऑफ सरदार २'मधून अभिनेत्रीचा पत्ता कट झाला आहे. 'सन ऑफ सरदार २'मध्ये सोनाक्षी सिन्हाच्या जागी अभिनेत्री मृणाल ठाकूरची वर्णी लागली आहे. या सिनेमात अजय देवगणसोबत मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसेल. मृणालने नुकतीच याबाबत पोस्ट करत ही माहिती दिली होती. मृणालला 'सन ऑफ सरदार २'मध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.  

टॅग्स :अजय देवगणमृणाल ठाकूरसेलिब्रिटी