टीव्ही अभिनेत्री रोशनी वालिया तिच्या आगामी 'सन ऑफ सरदार २' या सिनेमामुळे चर्चेत आहे. पण, सध्या मात्र सिनेमापेक्षा रोशनीच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. "काहीही कर पण प्रोटेक्शन वापर" असा सल्ला आईने दिल्याचा खुलासा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत २३ वर्षीय रोशनीने केला आहे. तिचं हे वक्तव्य प्रचंड व्हायरल झालं आहे. नेमकं काय म्हणाली रोशनी वालिया जाणून घेऊया.
रोशनी वालियाने नुकतीच हॉटरफ्लायला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सांगितलं की तिची आई सिंगल मदर आहे आणि रोशनी आणि तिच्या बहिणीचा सांभाळ तिच्या आईने एकटीने केला आहे. आईवडिलांचा खूप आधीच घटस्फोट झाला आणि त्यानंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं. त्यामुळे मुलींची जबाबदारी आईने घेतली. पण, आईने कधीच बंधनात ठेवलं नसल्याचं तिने सांगितलं.
"मी आज जे काही आहे ते माझ्या आईमुळेच आहे. तिच्यामुळेच मी योग्य संस्कारात वाढले. तिने स्वातंत्र्य आणि मार्गदर्शन या दोन्ही गोष्टी दिल्या. आईच्या नियमांचा कधीच दबाव वाटला नाही. उलट ते आजच्या काळाला अनुसरुन वाटले. आई मला नेहमी आठवण करून देते की प्रोटेक्शन(निरोध) किती महत्त्वाचं आहे. आधी ती मी माझ्या बहिणीला हे सगळं सांगायची आणि ती मलाही सांगते", असं रोशनीने सांगितलं.
पुढे ती म्हणाली, "ती मला नेहमी म्हणते की एन्जॉय कर. रात्री घरी का बसली आहेस? पार्टीला जा, मजा कर. तू आज दारू नाही प्यायलीस का? मला वाटतं कडक शिस्तीचे पालक असताता त्यांची मुलं जास्त बिघडलेली असतात. माझ्या आईसारख्या पालकांची मुलं जरा कमी बिघडलेले असतात, कारण ते सगळंच एकमेकांसोबत शेअर करत असतात".