Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिरने सलमानच्या हातातून काढून घेतला 'सितारे जमीन पर'? भाईजान म्हणाला- "आधी हा सिनेमा मला ऑफर झालेला, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 10:53 IST

आमिर खानआधी 'सितारे जमीन पर' सिनेमा सलमान खानला ऑफर झाला होता, असा खुलासा खुद्द भाईजाननेच केला आहे. 

आमिर खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत 'सितारे जमीन पर' हा सिनेमा आज(२० जून) सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या सिनेमातून दिव्यांग मुलांच्या बास्केटबॉल टीमची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. या मुलांच्या बास्केटबॉल कोचची भूमिका आमिर खानने साकारली आहे. पण, आमिर खानआधी हा सिनेमा सलमान खानला ऑफर झाला होता, असा खुलासा खुद्द भाईजाननेच केला आहे. 

नुकतंच 'सितारे जमीन पर' सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग पार पडलं. या स्क्रिनिंगला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सलमान खानही या स्क्रिनिंगला उपस्थित होता. सलमान आणि आमिरने पापाराझींना फोटोसाठी पोझही दिल्या. यावेळी आमिरआधी मला या सिनेमाची ऑफर होती, असं सलमान पापाराझींना मजेत म्हणाला. "याने तुम्हाला सिनेमाची स्टोरी सांगितली का? याने स्टोरी ऐकण्यासाठी मला बोलवलं होतं. मला सिनेमा खूप चांगला वाटला. मी लगेच हो बोललो. मी सिनेमाचं खूप कौतुक केलं होतं. आमिरला बोललो होतो की मी या सिनेमात चांगलं काम करेन. पण नंतर मला आमिरचा फोन आला की मी हा सिनेमा करतोय", असं सलमान पापाराझींना म्हणाला. त्याचं बोलणं ऐकताच आमिर हसू लागला. 

पुढे सलमान म्हणाला, "मी आमिरला सांगितलं होतं की हा सिनेमा खूप चालेल. त्यावेळी आमिर काम करत नव्हता. त्याचं तेव्हा स्क्रिप्टिंग, कागदपत्र यावर काम सुरू होतं. मी म्हटलं खूप चांगला सिनेमा आहे मी करेन. तर तेव्हा मला याने सांगितलं की मी हा सिनेमा करत आहे. हा रोल मला जास्त सूट करेल". त्यावर आमिर हसून म्हणाला, "असं होईल का की सलमान हा बोलेल आणि मी मध्ये येईन". 

दरम्यान, 'सितारे जमीन पर' सिनेमा हा २००७ साली प्रदर्शित झालेल्या आणि गाजलेल्या 'तारे जमीन पर' या लोकप्रिय सिनेमाचा सीक्वल आहे. या सिनेमात आमिर आणि जिनिलीया मुख्य भूमिकेत आहेत. तर या सिनेमात आमिर खानसोबत १० नवोदित कलाकारांचा सहभाग आहे.

टॅग्स :आमिर खानसलमान खान