Join us
Daily Top 2Weekly Top 5

या गायकाने शिष्याला आपले पाय धुवून पाणी प्यायला लावलं,सोशल मीडियावर उफाळला नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 11:21 IST

वाद आणि सेलिब्रिटी हे समीकरण काही नवं नाही. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सेलिब्रिटी वादात अडकतात आणि त्याची चर्चा होते. ...

वाद आणि सेलिब्रिटी हे समीकरण काही नवं नाही. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सेलिब्रिटी वादात अडकतात आणि त्याची चर्चा होते. असाच एक वाद पंजाबी गायकाबाबत समोर आला आहे. मास्टर सलीम असं या गायकाचं नाव आहे. मास्टर सलीमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक युवक एका ताटात मास्टर सलीमचे पाय धुऊन तेच पाणी पित असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ विविध माध्यमातून शेअर झाला असून यावरुन मास्टर सलीमवर टीका होऊ लागली आहे. वाद होत असल्याचे पाहून मास्टर सलीमने त्यावर सारवासारव करत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या युवकाने आपले पाय धुवावे आणि ते पाणी प्यावे हे आपल्यालाही मान्य नव्हतं. या घटनेमुळे मला अतीव दुःख होत आहे असं सांगणारा व्हिडीओ मास्टर सलीमने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या स्पष्टीकरणानंतरही नागरिकांचा राग काही शांत होत नसल्याचे दिसून येत आहे. विविध कमेंट्सच्या माध्यमातून मास्टर सलीमवर टीकेची झोड उठली आहे. या वादग्रस्त व्हिडीओमध्ये एका स्टीलच्या ताटात मास्टर सलीम पाय धुताना युवक पाहायला मिळतो. यावेळी तिथे हसतमुख वातावरण असल्याचे दिसून येत आहे. मास्टर सलीम या युवकाला त्याचे नाव विचारतो. त्यावेळी तिथे उपस्थित असणारे लोक त्या युवकाचे नाव राजवीर उर्फ नीटा असल्याचे सांगतात. त्यावेळी तो युवक त्या ताटातलं पाणी पिऊन टाकतो. त्यावेळी नीटाचा आता नीटा सलीम झाला अशी कुजबूज तिथं उपस्थित लोकांमध्ये सुरु होते. या सगळ्या प्रकारानंतर सोशल मीडियावर मास्टर सलीम नागरिकांच्या टीकेचा लक्ष्य झालाय.काहींनी तर मास्टर सलीमवर वैयक्तीक टीका करत खडेबोल सुनावले आहे. मात्र यावर आपल्याला तसं काही करायचं नव्हतं अशी सारवासारव मास्टर सलीमने केली आहे.गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुणीतरी मोबाईलवर हा व्हिडीओ शूट केल्याचं मास्टर सलीमने म्हटलं आहे.नीटानं शिष्य म्हणून आपला आशीर्वाद घेतला असा दावा मास्टर सलीमने केला आहे. पाय धुणे आणि पाणी पिण्यापासून नीटाला आपण स्वतः रोखण्याचा प्रयत्न केला असा दावाही सलीमने केला आहे.