Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘आवाजाचा जादूगार’ हरपला! एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन

By रूपाली मुधोळकर | Updated: September 25, 2020 14:25 IST

बालसुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण झाली होती.

ठळक मुद्दे1989 साली आलेल्या मैनें प्यार किया या सलमानच्या चित्रपटातील सर्व गाणी बालसुब्रमण्यम यांनी गायली होती. 

बॉलिवूडचे दिग्गज गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी आज अखेरचा श्वास  घेतला. ते 74 वर्षांचे होते. त्यांच्या मुलाने त्यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे.बालसुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावर त्यांनी मातही केली होती. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. तेव्हापासून  ते रूग्णालयात भरती होते. काल गुरूवारी त्यांची प्रकृती अचानक गंभीर झाली होती. त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.बालसुब्रमण्यम यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेकांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

5 आॅगस्टला स्वत: बालसुब्रमण्यम यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती.74 वर्षांच्या बालसुब्रमण्यम यांनी 16 विविध भाषांमधील जवळपास 40 हजारांवर गाणी गायली आहे. तेलगू, तामिळ,कन्नड, आणि हिंदी गाण्यांसाठी त्यांना सहावेळी सर्वोत्कृष्ट गायक  म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 2001 मध्ये त्यांना पद्मश्रीने तर 2011 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

‘सलमानचा आवाज’ 1989 साली आलेल्या मैनें प्यार किया या सलमानच्या चित्रपटातील सर्व गाणी बालसुब्रमण्यम यांनी गायली होती. ही सर्व गाणी तुफान लोकप्रिय झाली होती. सलमानच्या करिअरच्या सुरुवातीला सलमानसाठी त्यांनी अनेक गाणी गायली. अनेक वर्षे ‘सलमानचा आवाज’ म्हणूनच ते ओळखले जात होते.

लागोपाठ 12 तासांत 21 गाणी एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी 8 फेब्रुवारी 1981 रोजी एक अप्रतिम विक्रम रचला होता. त्यांनी सकाळी 9 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत कन्नडमध्ये 21 गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांनी एका दिवसात तामिळमध्ये 19 आणि हिंदीमध्ये 16 गाणी रेकॉर्ड केली होती. सुरुवातीच्या काळात एका दिवशी ते 15-16 गाणी रेकॉर्ड करणे ही त्यांची दिनचर्या झाली होती. पण गाण्याबद्दल ते तितकेच गंभीरही होते.  त्यांना एखादे गाणे कठीण वाटायचे त्यावेळी ते तयार करण्यासाठी 8-10 दिवसांचा कालावधी घेत़ निर्मात्यांनी घाई केली तर ते गाण्यासाठी थेट नकार देत असत.