Join us

"पत्नी म्हणजे दुसरी आईच" दीप्तीबद्दल श्रेयस तळपदे म्हणाला "तिने मला दुसरा जन्म दिला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 13:39 IST

श्रेयसने दीप्तीला 'दुसरी आई' असे संबोधत तिच्याबद्दलचे प्रेम आणि आदर व्यक्त केला.

Navratri 2025 : नवरात्री हा भक्ती, उत्साह आणि आनंदाचा सण. या नऊ दिवसांत देवीची आराधना करून तिच्या आशीर्वादाची याचना केली जाते. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत प्रत्येक दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहे. नवरात्र उत्सव हा देवी दुर्गाच्या नऊ रूपांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. नवरात्रोत्सवात स्त्री शक्तीचा जागर केला जातो. याच निमित्ताने अभिनेता श्रेयस तळपदेने त्याच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या महिलेबद्दल व्यक्त झाला. यावेळी त्यानं आपल्या पत्नीचं कौतुक केलं. 

श्रेयसने दीप्तीला 'दुसरी आई' असे संबोधत तिच्याबद्दलचे प्रेम आणि आदर व्यक्त केला. महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये श्रेयस म्हणाला की, "दीप्ती, माझं पहिलं आणि एकमेव प्रेम आहे. पत्नी ही दुसरी आईच असते. आईसारखं तिनं मला जपलं आणि मला दुसरा जन्मही दिला".

श्रेयसने त्यांच्या लग्नानंतरचा एक प्रसंग सांगितला. तो म्हणाला की, "लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मी 'इक्बाल' सिनेमाच्या शूटिंगसाठी गेला होता. तेव्हा दीप्ती कुटुंबासोबत दोन महिने राहिली. तिच्यासाठी ते घर नवीन होते, पण तिने लगेचच सर्वांना आपलेसे केले होते".

नुकत्याच आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याच्या घटनेबद्दल बोलताना श्रेयस अधिक भावूक झाला. तो म्हणाला, "अलीकडे मला हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा जीवाचं रान करून माझं आयुष्य वाचवण्यासाठी तिने धावाधाव केली. त्यामुळे मी तिला माझी आईच समजतो". श्रेयसने आयुष्यात आलेल्या कठीण काळात दीप्तीने दिलेल्या खंबीर पाठिंब्याबद्दल तिचे आभार मानले. 

श्रेयस आणि दीप्ती यांच्या सुखीसंसाराला आता २० वर्षे पूर्ण झाली. ३१ डिसेंबर २००४ मध्ये श्रेयस-दिप्ती लग्नबंधनात अडकले. श्रेयस तळपदे मराठी आणि हिंदी दोन्ही इंडस्ट्रीत तग धरुन आहे. दोन्हीतही त्याचं वेगळं स्थान आहे. लवकरच तो 'वेलकम टू जंगल' या सिनेमातही दिसणार आहे. यामध्ये अक्षय कुमारसह बॉलिवूडमधील इतर बरीच स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :श्रेयस तळपदेशारदीय नवरात्रोत्सव २०२५