Join us

संगीतकार श्रवण राठोड यांना कोरोनाची लागण होण्याआधी गेले होते कुंभमेळ्याला, मुलाने दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 16:46 IST

श्रवण यांच्या मुलानेच याविषयी सांगितले आहे.

ठळक मुद्देसंगीतकार नदिम श्रवण यांनी एकाहून एक हिट गाणी बॉलिवूडला दिली आहेत.

संगीतकार श्रवण राठोड यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील एस.एल.रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण काल त्यांची प्राणज्योत मालवली. 

श्रवण यांना कोरोनाची लागण होण्याच्या काही दिवस आधी ते कुंभमेळ्याला गेले होते. त्यांच्या मुलानेच इंडियन एक्सप्रेसशी बोलताना याविषयी सांगितले. त्यांचा मुलगा संजय राठोडने सांगितले, माझे आई-वडील काही दिवसांपूर्वी हरिद्वार येथील कुंभमेळ्याला गेले होते. माझी आई भाऊ, मी आम्ही सगळ्यांनाच कोरोनाची लागण झाली आहे. मी आणि माझी आई रुग्णालयात असून माझा भाऊ घरी क्वारंटाईन आहे. त्याला वडिलांचे अंत्यसंस्कार करण्याची परवानगी देण्यात आली. पण मला आणि आईला त्यांचे शेवटचे दर्शनदेखील घेता आले नाही. 

संगीतकार नदिम श्रवण यांनी एकाहून एक हिट गाणी बॉलिवूडला दिली आहेत. या जोडीने नव्वदीचा काळ गाजवला असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. नदिम सैफी आणि श्रवण राठोड यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. आशिकी या चित्रपटातील गीतांमुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. गुलशन कुमार यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी नदिम यांचे नाव आल्यानंतर ही जोडी तुटली. नदिम आता बॉलिवूडपासून दूर आहेत. 

नदिम श्रवण यांच्या जोडीने दिल है के मानता नही, साजन, सडक, साथी, दिवाना, फुल और काटे, राजा हिंदुस्तानी, जान तेरे नाम, धडकन, राजा, परदेस, दिलवाले यांसारख्या चित्रपटांना संगीत दिले असून त्यांची सगळीच गाणी आजही हिट आहेत.

टॅग्स :बॉलिवूड